...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:57 PM2021-08-02T16:57:33+5:302021-08-02T17:07:56+5:30

जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.

…And Milind Shinde was Miraculously Rescued! | ...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…!

...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले…!

googlenewsNext

कोरोनारुपी संकटाने जगभरात थैमान घातलं आणि सर्व व्यवसाय - उद्योग ठप्प झाले. इतर कार्यक्षेत्रांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीची परिस्थितीदेखील खालावली होती, सिनेमांचं चित्रीकरण तसेच प्रदर्शनाला टाळा लागला होता; परंतु कालांतराने परिस्थिती विरळ होत गेल्यामुळे सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आणि परत एकदा सिनेमा, मालिका तसेच वेगवेगळ्या चित्रीकरणाची कामं सुरु झाली.

नवीन तसेच ज्या चित्रपटांच्या चित्रीकरणाची कामं लॉकडाऊनमुळे अर्धवट थांबली होती, अनलॉकनंतर काही प्रमाणात ती कामे चालू झाली. या काळात एका आगामी मराठी चित्रपटाच्या उर्वरीत भागाच्या चित्रीकरणाचे काम चालू झाले, ज्यात आजवर अनेक नावाजलेल्या खलनायकी भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते "मिलिंद शिंदे" हे महत्वाची भूमिका साकारत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे आपल्या उत्तम अभिनय आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली.

मोठ्या प्रतीक्षेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहित होते. चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अश्या अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी  चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते. नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते, ते आपल्या तयारीमध्ये इतके गुंतले होते की आजूबाजूला कोणत्या गोष्टी चालू आहेत याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉट च्या चित्रीकरणाचा सराव करत होती.

कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती. या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे समजलं नाही परंतु जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला. 

या प्रसंगाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात, "एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही...! अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो, रात्रीच्या समयी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत मग ती मोठी जिमी जीब का असेना...! मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती, पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला....! मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं."

मिलिओरिस्ट फिल्म्स स्टुडिओ निर्मित तसेच शैलेश नरवाडे दिग्दर्शित ऍक्शन, ड्रामा, आणि नव्या धाटणीच्या विषयासह "जयंती" हा सिनेमा आपल्या हटके नावामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय ठरेल यात शंका नाही आणि आता तर जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या या घटनेनंतर तर या सिनेमाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. सेटवर घडलेल्या घटनेत सुदैवाने मिलिंद शिंदे यांना काही दुखापत झाली नाही. सेटवर काम करत असलेल्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे धोका थोडक्यात टळला नाहीतर सेटवर काहीतरी विपरीत नक्कीच घडलं असतं, असे चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले. "जयंती" हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येण्यास सज्ज होत आहे.
 

Web Title: …And Milind Shinde was Miraculously Rescued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.