"...आणि कर्त्या पुरुषाला गोळ्या घालतात", दहशतवादी हल्ल्यानंतर हळहळला प्रथमेश परब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:28 IST2025-04-24T12:27:41+5:302025-04-24T12:28:22+5:30
Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब यानेदेखील पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे.

"...आणि कर्त्या पुरुषाला गोळ्या घालतात", दहशतवादी हल्ल्यानंतर हळहळला प्रथमेश परब
काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून २८ जणांची निर्घृण हत्या (Tourists Killed In Pahalgam) केली. यात बहुतेक पर्यटक होते. या दहशतवादी हल्ल्याचा केवळ भारतातूनच नाही तर देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या मनातील खदखद सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. दरम्यान अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) यानेदेखील पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यावर हळहळ व्यक्त केली आहे.
प्रथमेश परब म्हणाला की, स्वर्गात तरी असं व्हायला नको होतं. स्वर्ग म्हणतात म्हणे त्या जागेला स्वर्ग जिकडे चांगली माणसं असतात. स्वर्ग जिकडे शांतता असते. स्वर्ग जिकडे रंगीबेरंगी गोष्टी असतात. हो आहेतच चांगली माणसं तिकडे जी धर्म विचारुन गोळ्या घालतात...चांगुलपणा तर इतका पूर्ण फॅमिलीला सोडतात आणि कर्त्या पुरुषाला गोळ्या घालतात.
अभिनेता पुढे म्हणाला की, ''हो आहेत शांतता तिकडे ज्यांची जवळची माणसं गेली त्यांची...भयाण शांतता... एक नवविवाहित तरुणी तिच्या जोडीदाराच्या बाजूला बसून शांत तर होतीच...शांतता अस्वस्थ करणारी पूर्ण देशाला,,, फक्त रंगबेरंगी गोष्टी मात्र नाहीत हो आता तिकडे..आहे तो फक्त लाल रंग....आता त्या लाल रंगाला ही जाती धर्मात वाटणार आणि त्याचा ही वापर अमृत म्हणून काही लोक करणार...'' ''राहून राहून हेच वाटतं...स्वर्गात तरी असं व्हायला नको होतं...स्वर्गात??? इतकं सगळं झाल्यावर खरंच तो स्वर्ग उरलाय??'', असं म्हणत त्याने दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय.