रागावलेल्या महिलेनं भररस्त्यात निळू फुलेंवर केली होती शिवीगाळ, तरीही शांत होते अभिनेते, वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:56 AM2024-03-08T09:56:14+5:302024-03-08T09:56:48+5:30
भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांनी संपूर्ण सिनेसृष्टी गाजवली. मराठी म्हणू नका की बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला.
भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांनी संपूर्ण सिनेसृष्टी गाजवली. मराठी म्हणू नका की बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला. आपल्या घोगऱ्या, बसक्या आवाजामुळे त्यांनी केवळ सहकलाकारालाच नाही तर प्रेक्षकांनाही भीतीच्या कवेत घेतलं. तसेच चित्रपटात ते बऱ्याचदा स्त्रियांवर जबरदस्ती करताना दाखवले गेले. त्यामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल राग होता. या संदर्भातला एक किस्सा निळू फुलेंनी सांगितला होता.
एकेदिवशी निळू फुले रस्त्यावरुन जात असताना एका महिलेनं त्यांना अडवलं आणि थेट त्यांच्या कानशिलात लगावली. इतकेच नाही तर शिवीगाळ करु लागली. तुला लाज वाटते का, बायकांशी असे वागताना तुला काहीच कसे वाटत नाही, बायकांकडे वाईट नजरेने पाहणे सोडून दे असे ती महिला म्हणत शिव्या शाप देत तिथून निघून गेली. ती एवढं बोलली तरीदेखील निळू भाऊ शांत उभे होते.
हीच माझ्या कामाची पोचपावती
एका मुलाखतीत हा किस्सा सांगताना निळू फुले म्हणाले होते की, 'मी जे काम करतो ते प्रेक्षकांना वास्तविक वाटते. त्यांना मी तसाच आहे असे वाटते. याचा अर्थ मी अभिनय चांगला करतो असाच आहे ना. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे असे मी म्हणू शकतो.'
निळू फुलेंनी २००९ साली घेतला जगाचा निरोप
मराठी सिनेविश्वात जेव्हा पौराणिक आणि कौटुंबिक कथांचा काळ सुरु होता, तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला. ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून न पाहता, २००९ पर्यंत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १३ जुलै, २००९ रोजी त्यांनी वयाच्या ७९व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. निळू फुले आज आपल्यात नाही. पण त्यांची कन्या गार्गी फुले त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे.