अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध पत्नीने केला छळाचा गुन्हा दाखल, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 01:45 PM2021-11-17T13:45:52+5:302021-11-17T13:46:12+5:30
अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ कलमाखाली अनिकेत याच्यासह त्याच्या आईवडिलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासरावच्या पत्नीचे नाव स्नेहा चव्हाण असून तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही मालिका व चित्रपटात काम केलं आहे.
अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण १० डिसेंबर, २०१८ साली लग्नबेडीत अडकले. या दोघांनी हृद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. खरेतर अनिकेत आणि स्नेहाचे अरेंज मॅरेज आहे. स्नेहाच्या घरातील तिच्या लग्नासाठी मुलगा पाहत होते आणि तिच्याच सोसायटीत अनिकेतची मावशी राहते. त्यावेळी तिने अनिकेतचे स्थळ स्नेहाच्या आईला सुचविले होते. एकाच क्षेत्रातील असल्यामुळे त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मानसिक व शारीरीक छळाचा गुन्हा केला दाखल
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्रेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. त्यातून फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात परत आली. त्यानंतर आता तिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'लाल इश्क' चित्रपटातून केले पदार्पण
अभिनेत्री स्नेहा चव्हाणने अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर ती 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात झळकली. याशिवाय ती सोनी मराठी वाहिनीवरील हृदयात वाजे समथिंक मालिकेत झळकली आहे.
मराठी चित्रपट व मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेता अनिकेत विश्वासरावने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हिंदीत त्याने 'चमेली' या चित्रपटात काम केले आहे. मराठीत 'फक्त लढ म्हणा', 'पोश्टर गर्ल' व 'बघतोस काय मुजरा कर' हे चित्रपट लोकांना भावले आहेत.