खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:32 IST2025-03-10T16:32:20+5:302025-03-10T16:32:42+5:30

पहिल्यांदाच अंकुश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकुश नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ankush chaudhary new marathi movie to play police in psi arjun cinema | खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत

खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत

उत्तम अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. दगडी चाळ, महाराष्ट्र शाहीर, क्लासमेट्स, धुरळा, गुरू अशा सिनेमांमधून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. आता पहिल्यांदाच अंकुश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकुश नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ असं सिनेमाचं नाव असून या सिनेमात अंकुश पी.एस.आय.अर्जुनच्या भूमिकेत दिसणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच अंकुश चौधरीच्या वाढदिवशी या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आलेले नाही. अंकुश चौधरीचा हा सिनेमा येत्या ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 


चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर  म्हणतात, “या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट."

Web Title: ankush chaudhary new marathi movie to play police in psi arjun cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.