'आत्ता आण्णा शरीराने नाहीत पण...', जयंत सावरकरांच्या निधनामुळे मिलिंद गवळी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:10 PM2023-07-25T18:10:53+5:302023-07-25T18:11:32+5:30
Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे २४ जुलैला निधन झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे २४ जुलैला वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. जयंत सावरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा, सून असा परिवार आहे. आज त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. दरम्यान आता अभिनेता मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळींनी इंस्टाग्रामवर जयंत सावरकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, "असं जगता आलं पाहिजे" अण्णांसारखा ( जयंत सावरकरांसारखा ), माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णां आपल्याला शिकवून गेले, आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, वर्षानुवर्ष, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे, १९८४ सालापासून ची आमची ओळख, गोविंद सराया यांच्या "वक्ते से पहिले" मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले, त्यानंतर १९९४-९५ मध्ये मनोहर सररवणकरांच्या "दैव जाणिले कुणी" या दूरदर्शनच्या टेलीफिल्म आम्ही बापलेकाची भूमिका केली त्यानंतर एकदम २०२२-२३ मध्ये "आई कुठे काय करते" मध्ये काम केलं. म्हणजे तब्बल ३८ वर्षा मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो.
आता वयाच्या ८६-८७ वर्षाचे अण्णा "आई कुठे काय करते"च्या सेटवर , यायचे अगदी "वेळेवर" कॉल टाईमच्या अर्धा तास आधी. अगदी छान तयार होऊन , एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानसे जॅकेट आणि हॅट असायची, मग वेळ न घालवता मेकअप करून, कॉश्च्युम घालून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे, मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागून घ्यायचे, मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे, बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बरं एक दोन पानं नाही तर १७ ते १८ पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा सूचना असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे, एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे, असे मिलिंद गवळींनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, माझी आणि अण्णांची एकच मेकअप रूम होती, त्यामुळे अण्णांच्या जुन्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची, ते Encyclopedia होते, अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना डिटेल्समध्ये आठवायच्या, बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची, इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh ,active ,energetic असायचे, हसत मुख, सेटवर एका प्रोफेशनल कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. अण्णांनी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी, सौभाग्य मिळालं आहे ते खरंच भाग्यवान आहेत, मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो, आत्ता आण्णा शरीराणे नाहीत पण यांचा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे, मिश्किल स्वभाव , आयुष्यं कसं छान जगाव. आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत.