उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा
By कोमल खांबे | Updated: February 17, 2025 15:00 IST2025-02-17T14:59:50+5:302025-02-17T15:00:21+5:30
'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमात अभिनेता अनुप सिंगने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती.

उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा
सध्या विकी कौशलचा छावा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पण, याआधीही छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक सिनेमे बनवले गेले. यातीलच एक मराठी सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमात अभिनेता अनुप सिंगने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती.
अनुपने नुकतीच फ्री प्रेस जनरलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा सांगितला. अनुप म्हणाला, "साताऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉडीबिल्डिंगची स्पर्धा ठेवली होती. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. मला त्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत काही इंटरेस्ट नव्हता. कारण त्यासाठी मला मुंबईवरुन साताऱ्याला जावं लागणार होतं. आणि माझं शेड्युल पॅक होतं. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा वाढदिवस आहे. आणि ते स्वत: येणार आहेत. यासाठी मला त्यांना भेटण्यासाठी जायचं होतं. म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगितलं की मी महाराजांसाठी येतो".
पुढे त्याने सांगितलं, "उदयनराजे आले आणि त्याने शिवाजी महाराजांनी वंदन केलं. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की जर मी यांचा वंशज असतो तर मी काय केलं असतं. ती भावना कशी असती? त्यानंतर मी उदयनराजेंना भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि त्यांच्यासोबत मी फोटो काढला. तो फोटो लोकल वृत्तपत्रात छापून आला होता. ते वृत्तपत्र सिनेमाच्या निर्मातांच्या ऑफिसमध्ये गेलं. तो फोटो बघूनच तिथले निर्माते म्हणाले हा तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा दिसत आहे. तीन महिन्यांनी मला त्यांच्याकडून या भूमिकेसाठी फोन आला होता. मी सुरुवातीला मराठी सिनेमा म्हणून नकार दिला होता. कारण, मी तेव्हा फक्त हिंदी सिनेमा करण्याचं ठरवलं होतं. पण, जेव्हा मला कळलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायची आहे. तेव्हा मी लगेच होकार देऊन टाकला".
'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या सिनेमात अमृता खानविलकरने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तर किशोरी शहाणे राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत होत्या. या सिनेमाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.