​मगरींनी घेरूनही ‘तो’ चरणदास चोर सहीसलामत सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 04:58 AM2017-12-26T04:58:43+5:302017-12-26T10:28:43+5:30

ठिकाण... चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर....वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले टुमदार शंकर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरचा घाट... घाटाच्या एका कोपऱ्यात ...

Around the crocodile, 'he' left the Chanderdh thief to settle down | ​मगरींनी घेरूनही ‘तो’ चरणदास चोर सहीसलामत सुटला

​मगरींनी घेरूनही ‘तो’ चरणदास चोर सहीसलामत सुटला

googlenewsNext
काण... चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर....वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले टुमदार शंकर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरचा घाट... घाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या कडुनिंबाच्या डेरेदार वृक्षाची एक भली मोठी फांदी वीस-पंचवीस फुट उंचावरून नदीपात्रात हेलकावे घेत होती आणि त्या फांदीवर एक तरूण घाईघाईने आणि महत्प्रयासाने वर चढून बसला होता. आधीच गावात चोर शिरल्याची कुजबुज होती. त्यात त्या फांदीवर घाईघाईने चढणारा तरुण पाहून, तोच चोर असल्याची काहीजणांनी आवई उठवली आणि अख्खा गाव घाटावर लोटला. इतकं असूनही एक पर्यटक तरुणी खाली नदीत एका नावेतून मुक्त विहार करत होती. त्या तरूणाचे हावभाव काही वेगळेच होत होते. त्या तरुणीकडे पाहून तो संवाद साधणार इतक्यात.... एका गावकऱ्याने ती फांदी कमकुवत असून तो केव्हीही खाली पडेल आणि पाण्यात मगरी असल्याचे ओरडून सांगितले. झालं! सर्वांच्याच काळजात धस्सं झालं. तो तरुणही भांबावला आणि ती तरुणीही... दोघेही मदतीच्या अपेक्षेने साद घालणार... इतक्यात ‘कट’ असा जोरदार आवाज आला.
गावकऱ्याच्या नजरा मागे वळल्या... दूरवर एका उंचवट्यावरून तो आवाज आला. तेव्हा गावकऱ्यांना समजले की, तिथे चरणदास चोर चित्रपटाची शुटींग सुरू आहे. तो झाडावर चढलेला तरुण, चित्रपटाचा मुख्य नायक ‘चरण’ म्हणजे अभय चव्हाण आणि पाण्यात नावेत विहार करणारी तरुणी म्हणजे अभिनेत्री सोनम पवार होती. दिग्दर्शक श्याम महेश्वरी यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. मगर नावेच्या जवळ येऊ नये म्हणून काही गावकरी दुसऱ्या नावेतून पाण्यात उतरले आणि सीन पुन्हा सुरू झाला.
सायलेन्स....रेडी....रोल कॅमेरा.....ॲण्ड ॲक्शन! असा आदेश झाला. झाडावर बसलेल्या अभयची पुन्हा बोलती बंद झाली. खरंच नदीपल्याड किनाऱ्यावर एक मगर हालचाल करताना त्याला दिसली. पण, तो काहीही बोलला नाही. दिग्दर्शकाच्या ही गोष्ट लक्षात आली. कारण, कॅमेऱ्यातून ती मगर स्पष्टपणे दिसत होती. तो सीन कसाबसा पूर्ण करून उर्वरित सीन साठी ‘चरण’ म्हणजे अभय चव्हाणला पाण्यात उतरायचे होते. आता मात्र खरी पंचायत होती. सीन पूर्ण करणे गरजेचे होते. दिग्दर्शक श्याम माहेश्वरी आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे दोघांनी मगरींची चाहूल घेण्यासाठी कॅमेऱ्यात कुठेही दिसणार नाही, अशा पद्धतीने ज्या नावेमध्ये दोघांचा रोमँटिक सीन शुट होणार होता, त्या भोवती गावकऱ्यांच्या साथीने प्रोडक्शन टीमचे कडे निर्माण केले. नायिका सोनम पवार बिनधास्त होती. कारण तिने मगर पाहिली नव्हती. पण, अभय चव्हाणची मात्र पाचावर धारण बसली होती. त्यात रोमँटिक सीन. अशा अवस्थेत रोमँटिक अभिनय करायचा तरी कसा? असा त्याला प्रश्न पडला. रिटेकवर रीटेक होऊ लागले. “झक मारली आणि हा चित्रपट स्विकारला!” अशा भावनेतून कसाबसा अभयने सीन पूर्ण केला.
पाण्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी सर्वच जण नाव जोरात हाकू लागले. इतक्यात, तीन लहान मगरी पाण्यावर तरंगताना दिसल्या. पण, त्या मगरींची काहीच हालचाल नव्हती. हे पाहून कसेबसे सर्वजण पाण्याबाहेर आले आणि संपूर्ण टीमने सुटकेचा निश्वास टाकला. पाण्याबाहेर आल्यावर अभयने हा सर्वप्रकार अभिनेत्री सोनमला सांगितला. तेव्हा तिची प्रतिक्रिया ऐकून सर्वांनाच हसू फुटलं....” कदाचित, मगरींचे जेवण झालेले असावे आणि त्यांना समजले असेल तू खरा चोर नाहीस ते.” अशा रीतीने मगरींच्या तावडीतून चरणदास चोर आणि चोरनी दोघेही बचावले.
कोकणच्या निसर्गसंपन्न वातावरणात चित्रीत झालेला युनिट प्रोडक्शन निर्मित तार्किक-मार्मिक विनोदी 'चरणदास चोर' हा चित्रपट येत्या 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

Also Read : कोण जिंकणार ‘ i Phone X’ ?

Web Title: Around the crocodile, 'he' left the Chanderdh thief to settle down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.