कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पोलिसांकडून मानवंदना
By राजेश भोस्तेकर | Published: August 4, 2023 06:23 PM2023-08-04T18:23:56+5:302023-08-04T18:25:27+5:30
Nitin Chandrakant Desai: नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कार वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकिय,सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार वेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - सुप्रसिद्ध सिनेकला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या इच्छेनुसार एन डी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार व्हावे ही त्यांची शेवटची इच्छा होती. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कार वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकिय,सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार वेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली
मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नितीन चंद्रकांत देसाई हे एक मोठे नाव होते,अनेक वर्षे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले,अनेक मराठी तरुणांना देखील त्यांनी एक रंगमंच उभा करून दिला, राजकीय क्षेत्रात त्यांची मोठी उठक बैठक असायची, अनेक सिनेमे त्यांनी सुपरहिट केले असून कलाक्षेत्रातील नामवंत नाव म्हणून नितीन देसाई यांच्याकडे पाहिले जात होते.
खालापूर तालुक्यातील कर्जत रोडवर हातणोली गावाच्या बाजूलाच जवळपास बावन्न एकर जागेवर एन.डी स्टुडिओ नावाचा भव्य सिनेकृती सेट नितीनी देसाई यांनी उभारला होता. एन डी स्टुडिओ मध्ये भव्य दिव्य कलाकृती उभारून अनेक गाजलेल्या सिनेमा निर्मिती देसाई यांनी कलेच्या माध्यमातून केली होती. रायगडमधील अनेक तरुण तरुणींना या स्टुडिओमुळे चांगले प्लॅटफॉर्म मिळाले असून अनेक स्थानिकांना इथे रोजगार देखील देसाई यांनी उपलब्ध करून दिला आहे. देसाई यांच्या अचानक जाण्याने स्थानिकही दुःखाच्या विरहात गेले आहेत.
नितीन देसाई यांनी काही कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याने ती रक्कम ते फेडू शकत नसल्याने कर्जावरील व्याज वाढून ती वाढतच गेली होती. मात्र त्या कर्जाच्या मोबदल्यात एन.डी स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याचे आदेश आदेश रायगड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते, तशी कारवाई सुरू असल्याचे बोलले जात होते. स्वतः च्या हाताने उभारलेले वैभव जाणार या गोष्टींची सल मनात राहिल्याने नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडिओमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील केले असल्याने त्यांची फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये काही उद्योगपतींची नावे आहेत.
नितीन देसाई यांच्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी एन.डी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराला राजकिय, सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. देसाई यांनी महाराष्ट्राचे नाव देखील देशात उंच केले असून दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कलाकृतींमध्ये महाराष्ट्राची परंपरा या चिञरथाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळविला होता,तर त्यांना चार वेळा उत्कृष्ट सिनेकला दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले होते.
देसाई यांना रायगड पोलिसांच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. त्यांच्या जाण्याने मराठी व हिंदी कलासृष्टी पोरकी झाली असून एका दिगग्ज कलाकाराला मुकली आहे.