रेल्वे अपघातात कलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 07:26 AM2018-01-22T07:26:31+5:302018-01-22T15:36:28+5:30
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात रेल्वे अपघाताच्या घटना वारंवार कानावर पडत असतात. मात्र सोमवारची सकाळ मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतासाठी दुःखद ...
म ंबईच्या धकाधकीच्या जीवनात रेल्वे अपघाताच्या घटना वारंवार कानावर पडत असतात. मात्र सोमवारची सकाळ मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतासाठी दुःखद बातमी घेऊन आली. मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनजवळ बालकलाकार प्रफुल्ल भालेराव याचा अपघाती मृत्यू झाला आहे. छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'कुंकू' या मालिकेमुळे प्रफुल्ल घराघरात पोहचला. या मालिकेत प्रफुल्लने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. याशिवाय 'तू माझा सांगती', 'आवाज- ज्योतिबा फुले','नकुशी' मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘बारायण’ या सिनेमातही प्रफुल्लने भूमिका साकारली होती. सिनेमा आणि मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारुन प्रफुल्लने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं आणि काळाने एका उद्योन्मुख कलाकाराला हिरावून नेलं. प्रफुल्लच्या अकाली एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतात हळहळ व्यक्त होत आहे. तसंच संपूर्ण भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.