अशी घेतली कलाकारांनी 'बॉईज २' साठी मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 09:46 AM2018-10-06T09:46:10+5:302018-10-06T10:21:55+5:30
सुपरहिट 'बॉईज' च्या यशानंतर, 'बॉईज २' चा सिक्वेल धमाकेदार करण्यासाठी सिनेमाच्या सर्व कलाकारांची कसून मेहनत कामाला आली
सुपरहिट 'बॉईज' च्या यशानंतर, 'बॉईज २' चा सिक्वेल धमाकेदार करण्यासाठी सिनेमाच्या सर्व कलाकारांची कसून मेहनत कामाला आली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील गल्ला लक्षात घेता, सिनेमातील सर्व तरुण कलाकारांकडून करवून घेतलेली मेहनत कामी आली असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, 'बॉईज २' सिनेमाच्या चित्रिकरणापूर्वी सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांसोबत सिनेमातील सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर या कलाकारांची तब्बल तीन महिने कसून तयारी करण्यात आली असल्याचे समजते.
'बॉईज २' चा दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि संवादलेखक ह्रषिकेश कोळी यांच्या कडक आणि शिस्तबद्ध वर्कशॉपमध्ये या सर्व कलाकाराना मौखिक कौशल्याबरोबरच अंग पिळवटून निघेल इतकी शारीरिक मेहनतदेखील घ्यावी लागली होती. या वर्कशॉपबद्दल बोलताना सुमंत शिंदेने असे सांगितले कि, 'या सिनेमात काही अॅक्शन सीन्स आहेत. सिनेमाचा खलनायक ओंकार भोजणेसोबत फायटिंगचा एक आहे. त्याचा सराव करताना आम्हा दोघांना रात्री ३ वाजेपर्यंत जागावे लागले आहे. स्टंंट रियल वाटावा म्हणून विशाल दादाने आमच्याकडून कसून सराव करून घेतला. ज्यात आम्ही एकमेकांचा भरपूर मारदेखील खाल्ला आहे. इतकेच नव्हे तर, सर्वच कलाकारांनी सरावादरम्यान एकमेकांच्या थोबाडात लगावल्या आहेत. अगदी मुलीदेखील त्याला अपवाद नाही.'
या सिनेमातील प्रत्येक पात्राला जिवंतपणा येण्यासाठी, वर्कशॉपमध्ये नवनवीन क्लृप्त्या राबविल्या जायच्या. याबद्दल बोलताना पार्थ भालेराव सांगतो कि. 'मला धुंग्या या व्यक्तिरेखेसाठी माझ्या चालीत बदल करायला सांगितले होते. त्यासाठी संपूर्ण सरावात दिवसभर माझ्या पायात १० किलो वजन बांधलेल असायच. मला याआधी काही कळेचना, पण जेव्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली, तेव्हा माझ्यातला बदल मला आपसूक जाणवला.'
कॉलेज तरुणाईचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमात किशोरावस्थेतून युवावस्थेची पायरी चढणाऱ्या आजच्या युथची गोष्ट मांडण्यात आली आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. तसेच, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील या सिनेमाचे वितरण केले जाणार असल्यामुळे, तरुणाईने बहरलेला हा 'बॉईज २' देशाबाहेरील प्रेक्षकांनादेखील चिरतरुण मनोरंजनाची अनुभूती देण्यास पुढे सरसावला आहे.