"एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून...", प्रिया बेर्डेंची अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:19 PM2024-10-26T12:19:16+5:302024-10-26T12:20:27+5:30
आज लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची जयंती असून त्यानिमित्ताने प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे झपाटलेला, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, अफलातून आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांची जयंती असून त्यानिमित्ताने प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो शेअर करत लिहिले की, ७० वर्ष .... आज जन्मदिवस. अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे, एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्या बद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात. विनोद अनेक रूपाने समोर आला कधी दादा गिरीने तर कधी विनोदाचा सम्राट,तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळी त या कर्ट्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला..आणि राहणार फक्त ... 'लक्ष्या '
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेंना बालपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. १९८३-८४ मध्ये टूर टूर या मराठी नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर, ते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका (१९८४) आणि दे दना दन (१९८५) या चित्रपटात एकत्र काम केले.
२००४ साली अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
१९८९ साली सलमान खानबरोबर मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले. सर्वांना खळखळून हसविणार्या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील योगदानामुळे आजही ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.