मला जर कोणासारखं बनायचं असेल तर मी ‘अमरजा’सारखी बनेन- हेमल इंगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:35 PM2019-02-27T17:35:43+5:302019-02-27T17:40:21+5:30
हेमल हे नाव आता लोकप्रिय झाले आहे. मराठी सिनेमातील तिचा अभिनय पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी १ मार्चपासून प्रत्येकाची मने जिंकायला आणि आशिकी करायला भाग पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. हेमल हे नाव आता लोकप्रिय झाले आहे. मराठी सिनेमातील तिचा अभिनय पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने हेमलशी केलेली खास बातचीत वाचकांसाठी.
या सिनेमात हेमलने ‘अमरजा’ हे पात्रं साकारलं आहे. या पात्राविषयी सांगताना हेमलने म्हटले की, “अमरजा पात्रं हे खूप स्ट्रॉंग आणि आयडीयालिस्टिक आहे. आजच्या मॉडर्न मुली असतात, ज्या स्वत:चे निर्णय स्वत: घेतात आणि निर्णय घेतल्यावर मागे वळून पाहत नाहीत, अशी अमरजा आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य असं की अमरजा खूप चांगली लिडर आहे. ती तिच्या ग्रुपमधल्या सगळ्यांना तिने ठरवलेली गोष्ट सर्वांना करायला लावू शकते आणि करुन दाखवत असते. पर्सनली मला असं वाटतं की, मला जर कोणासारखं बनायचं असेल तर मी अमरजासारखी बनेन. आणि सर्व मुलींना पण नक्कीच असं वाटेल.”
अभिनय बेर्डेसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असं विचारल्यावर तिने म्हटले की, “अभिनय बेर्डे हे नाव ऐकल्यावर एक गोड चेहरा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचा फेव्हरेट, चॉकलेट बॉय असा हा अभिनय आहे आणि त्याच्यासोबत काम करतानाचा माझा अनुभव खूप चांगला होता. तो खूप डाऊन टू अर्थ आहे, हेल्पफुल आहे. भले तो स्टार किड आहे तरी सेटवर सगळ्यांना सांभाळून घेतो. मग ती मी असो किंवा सिनेमातला आमचा फ्रेण्ड सर्कल, त्याने खूप सुंदर पध्दतीने सांभाळून घेतलं.”
सचिनजी यांचा सिनेमा आणि त्यांनी फोटोस् पाहून रिजेक्ट केल्यावर तुला प्रत्यक्षात समोर पाहिल्यावर डायरेक्ट सिनेमाची हिरोईन म्हणून फायनल केलं, तेव्हा तुला कसं वाटलं, असं विचारल्यावर यावर उत्तर देत हेमलने सांगितले की, “मी माझे ब्युटी कॉन्टेस्ट संपवलेले आणि मला वाटलेलं की मी आता अभिनयाकडे वळू शकते.त्यावेळी माझ्या मामाने सचिन सरांना माझे फोटोस् पाठवले होते. त्यावेळी मी लहान होते आणि मॉडेलिंग करत होते त्यामुळए माझ्या चेह-यावर मॉडेलसारखा लूक होता. ज्यावेळी सचिन सरांना भेटले त्यावेळी त्यांच्या लक्षात नव्हते की त्यांनी माझे फोटोस् आधी पाहिले होते. मी त्यांना ती आठवण करुन दिली. तेव्हा ते म्हणाले की, ‘बाळा तू खरंच वेगळी दिसत होतीस. आता तुझ्या चेह-यावर गोडवा आहे मी खरंच ग्रेटफुल आहे की त्यावेळी मी त्यांना भेटले आणि त्यामुळेच त्यांना माझ्यामध्ये ‘अमरजा’ हे पात्रं सापडलं.”
एव्हरग्रीन अभिनेते सुनील बर्वे यांच्यासोबतही काम करण्याची संधी हेमलला मिळाली. त्याविषयी सांगताना तिने म्हटले की, “सुनिल बर्वे सर खूपच ग्रेट व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत माझे बरेच सीन्स आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. अतिशय सहज, सुंदर आणि नॅचरल पध्दतीने ते त्यांचे सीन्स देतात. त्यांनी मला आशिर्वाद दिला, खूप सा-या टिप्स दिल्या, त्यांनी मला सांगितलं की, ‘हेमल तू खूप पुढे जाणार आहेस’. आणि त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला.”
मुंबईचा मुलगा आणि कोल्हापूरची मुलगी हे कॉम्बिनेशन अगदी कट वड्यासारखं आहे. कारण कोल्हापूरची मिसळ आणि मुंबईचा वडा हे फेमस आहे आणि ते एकत्र केलं की कट वडा बनतो आणि आमची आशिकीही तशीच आहे. सुंदर कॉम्बिनेशन आहे, असेही हेमलने सांगितले.
हेमलने तेलुगू सिनेमा केला आहे आणि कन्नडा प्रोसेसमध्ये आहे, तर अशा किती भाषा हेमलला येतात या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, “मला तितकं अस्खलित नाही बोलता येतं, थोडं फार येतं. पण मला जेव्हा स्क्रिप्ट दिली जाते तेव्हा स्क्रिप्ट मी मस्त पाठ करते. ती माझी स्ट्रेन्थ आहे की माझं पाठांतर खूप चांगलं आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन, तेलुगू, कन्नडा, तामिळ येतं आणि थोडं फार अजूनही शिकतेय.”