थोडी गोंडस, थोडी हळवी कहाणी; 'अशी ही जमवाजमवी'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ-वंदना गुप्तेंची धमाल केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:27 IST2025-04-02T12:23:49+5:302025-04-02T12:27:20+5:30
'अशी ही जमवाजमवी' या आगामी मराठी सिनेमाचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे (ashok saraf, vandana gupte)

थोडी गोंडस, थोडी हळवी कहाणी; 'अशी ही जमवाजमवी'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ-वंदना गुप्तेंची धमाल केमिस्ट्री
मराठी मनोरंजन विश्वात एका खास सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे 'अशी ही जमवाजमवी'. अशोक सराफ (ashok saraf) आणि वंदना गुप्ते (vandana gupte) ही मराठी सिनेसृष्टी गाजवणारी अनुभवी जोडी अशी ही जमवाजमवी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा खास ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला नुकताच आला आहे. या ट्रेलरमध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंची हटके केमिस्ट्री बघायला मिळतेय. 'प्रेमाला वयाचं बंधन नसतं', हे दर्शवणारा 'अशी ही जमवाजमवी' सिनेमाचा ट्रेलर खूप खास आहे.
अशी ही जमवाजमवीच्या ट्रेलरमध्ये काय
अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या 'अशी ही जमवाजमवी'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, दोन तरुण मुलं पिकनीकला आली असतात. तिथेच त्यांचे आजी-आजोबाही आलेले असतात. दोघांच्या आजी-आजोबांची एकमेकांशी गाठ पडते. दोघांमध्ये चांगलीच मैत्री होते आणि विषय पुढे सरकतो. पुढे दोघांच्या घरचे उतारवयात प्रेमात पडणाऱ्या या जोडीकडे कसं बघतात? त्यांची लव्हस्टोरी यशस्वी होण्यासाठी नातवंडं कशी मदत करतात? याची मजेशीर कहाणी 'अशी ही जमवाजमवी'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. अशोक सराफ-वंदना गुप्तेंच्या विनोदाचा अफलातून टायमिंग ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतोय.
कधी रिलीज होणार अशी ही जमवाजमवी
भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचा मुलगा राहुल शांताराम यांनी मनोरंजनविश्वात सिनेप्रेमींसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे. 'राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या अनुभवी कलाकारांसोबत सिनेमात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे.