'सविता भाभी' तडीपार, 'अश्लील उद्योग मित्र मंडळ'ची झाली गोची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 12:14 PM2020-03-04T12:14:10+5:302020-03-04T12:14:50+5:30
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून 'सविता भाभी'ची चर्चा आहे.
आगामी मराठी सिनेमा 'अश्लील उद्योग मित्र मंडळ'च्या अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमातील सविता भाभी या पात्राला घेऊन अनेक वाद होताना दिसतायेत. आता दिग्दर्शकांना सविता भाभी या भूमिकेला तडीपार करावे लागणार आहे. या सिनेमाचे निर्माते अंबरीश दरक आणि सविता भाभी या काल्पनिक पात्राचे कॉपीराईट असलेल्या निलेश गुप्ता यांच्यात करार झाला होता. त्यानुसार सिनेमात ज्या ठिकाणी सविता भाभीच्या नावाचा उल्लेख आहे तो काढावा लागणार आहे.
सविता भाभी या काल्पनिक पात्राचे कॉपीराईट निलेश गुप्ता यांच्याकडे आहे आणि कॉपीराईट माझ्याकडे असताना देखील सिनेमाच्या निर्मात्यांने माझ्याकडे परवानगी मागितली नाही असं गुप्ता यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाच्या निर्मात्यांना याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली होती.
काही दिवसांपूर्वी पुण्यात विविध ठिकाणी 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' या मजकूराचे फ्लेक्स सर्वत्र लागले होते. हा फ्लेक्स म्हणजे सिनेमाच्या प्रमाशेनची क्लुप्ती होती. धर्मकिर्ती लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित 'अश्लिल उद्योग' हा सिनेमा 6 मार्चला रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये सविता भाभी नावाचे पात्र दाखविण्यात आले आहे. तरुणांच्या लैंगिक भावानांवर हा सिनेमा आधारीत आहे. यात अभय महाजन, पर्ण पेठे, सई ताम्हणकर, अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.