अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:56 AM2024-03-08T10:56:09+5:302024-03-08T10:59:48+5:30
अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, तर आता संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता.
अशोक सराफ यांचा सन्मान होतानाचा कार्यक्रमातील एक खास व्हिडीओ निवेदिता यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'खूप खूप अभिमान वाटला अशोकना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून. आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या जनतेचे ऋणी आहोत'. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी एकूण ९४ कलाकारांना प्रदान करण्यात आले. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी देशातील कलाकार आपली भारतीय कला आणखी समृद्ध करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
'कलाकार त्यांच्या कलेतून रूढीवादी प्रवृत्तींना आव्हान देतात. ते आपल्या कलेतून समाजप्रबोधन करतात. आमच्या कला या भारताच्या सॉफ्ट-पॉवरचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. म्हणूनच त्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. देशातील कलाकार संगीत आणि नाटकाच्या विविध प्रकार आणि शैलींद्वारे भारतीय कला परंपरा समृद्ध करत राहतील', असा विश्वासही द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.