"अशोक सराफ आणि माझं नातं भावासारखं, पण लक्ष्या आमच्यावर जळायचा...', सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 07:00 AM2023-08-17T07:00:00+5:302023-08-17T07:00:00+5:30
नव्वदच्या दशकात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी धुमाकूळ घातला होता. या चौघांनी एकापेक्षा एक दमदार सुपरहिट चित्रपट केले. जे आजही तितक्याच आवडीने आवर्जुन पाहिले जातात.
नव्वदच्या दशकात अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी धुमाकूळ घातला होता. या चौघांनी एकापेक्षा एक दमदार सुपरहिट चित्रपट केले. जे आजही तितक्याच आवडीने आवर्जुन पाहिले जातात. त्यावेळी अशोक सराफ यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत जशी मैत्री होती त्याहीपेक्षा जास्त ते सचिन पिळगावकर यांच्याशी जास्त जवळचे झाले होते.
सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हेदेखील चित्रपट बनवत असत. त्यामुळे पिळगावकर कुटुंबात अशोक सराफ यांचे जाणेयेणे जास्त होते. श्रावण महिन्यात तर अशोक सराफ आपला उपवास सोडण्यासाठी पिळगावकरांच्या घरी हक्काने जात असत. शरद पिळगावकर आणि अशोक सराफ हे एकत्र बसूनच उपवास सोडत. जेव्हा शरदजींचे निधन झाले. त्यानंतरही सचिन पिळगावकर यांच्या आईने अशोक सराफ यांना श्रावणाचा उपवास सोडायला हक्काने बोलावायचा. आपल्या मुलाप्रमाणेच त्यांचे रिलेशन जुळून आले होते. त्यामुळे सचिन पिळगावकर अशोक सराफ यांना मोठे बंधू मानतात. या दोघांनी एकत्रित चित्रपट केल्यापासून दोघांचीही मैत्री घट्ट झाली. या दोघांना पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटायचा.
लक्ष्मीकांत बेर्डेंना वाटत होती ही खंत
अशोक सराफ यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपट केले होते. त्यामुळे त्या दोघांचीही छान मैत्री होती. मात्र सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम न केल्यामुळे त्यांच्यासोबत तेवढी मैत्री झाली नाही अशी खंत लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटत होती. ही खंत त्यांनी सचिन पिळगावकर यांच्याकडे बोलूनही दाखवली होती. स्वतः सचिन पिळगावकर यांनीच या मैत्रीचा किस्सा मी होणार सुपरस्टारच्या मंचावर शेअर केला आहे.
''अशोकचं आणि माझं नातं भावासारखं आहे''
सचिन पिळगावकर लक्ष्मिकांत बेर्डें सोबतची आठवण सांगताना म्हणाले की, “अशोकचं आणि माझं नातं भावासारखं आहे. अशोकने एक वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात निभावली आहे, ती म्हणजे मोठ्या भावाची. आम्ही दोघे चित्रपटातून एकत्रित काम करत होतो तेव्हा माझी त्याच्याशी एक वेगळ्या प्रकारची मैत्री सुरू झाली, मग आमच्या दोघांची एक वेगळी साथ सुरू झाली. आमच्या या साथीला हा लक्ष्या खूप जळायचा. होय, कारण लक्ष्याबरोबर मी कधीच काम केलेलं नव्हतं. त्याला असं वाटायचं की मी काम नाही केलं म्हणून माझी सचिनसोबत मैत्री झाली नाही. तो मला सारखं म्हणायचा की, एकदा तरी मी तुझ्यासोबत काम करूनच दाखवेन’. त्यानंतर या दोघांनी अशी ही बनवाबनवी, एका पेक्षा एक आणि आयत्या घरात घरोबा या चित्रपटांत एकत्रित केला आणि त्यानंतर या दोघांनी आणखी काही चित्रपटातून एकमेकांना साथ दिली. अशी ही बनवाबनवी ही सचिन पिळगावकर यांनी केलेला चित्रपट क्लासिक ठरला.