अशोक सराफ अन् निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा, चक्क शाहरुख काजोलच्या DDLJ मध्ये बघायला मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 09:52 AM2023-04-04T09:52:17+5:302023-04-04T09:53:32+5:30
अशोक मामांच्या 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात तो किस्सा सांगण्यात आला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील आयकॉनिक जोडी अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांची. दोघांमधील प्रेम इतक्या वर्षांनंतर आजही चिरतरुण आहे. जुन्या काळी आजकालसारखं पटकन प्रेम व्यक्त करता यायचं नाही. प्रेयसीला किंवा प्रियकराला मनातलं सांगण्यासाठी खूप धाडस करावं लागायचं. मग चित्रपटांमधून प्रपोज कसं करायचं याच्या कल्पना सुचू लागल्या. अशोक मामांनाही निवेदिता यांच्या प्रेमाची जाणीव केव्हा झाली तो किस्सा 'मी बहुरुपी' या त्यांच्या आत्मचरित्रात देण्यात आला आहे. दोघांचा खऱ्या आयुष्यातील हाच किस्सा नंतर योगायोगाने शाहरुखच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमात बघायला मिळाला.
'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात लिहिले आहे की, '1988 साली अशोक सराफ यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मानेला झटका बसला होता. यानंतर त्यांनी जवळपास सहा महिने विश्रांती घेतली. बऱ्याच कालावधीनंतर पूर्ण बरे होऊन त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. एका गाण्याचं शूट करत असताना सेटवर निवेदिता सराफ त्यांची खूप काळजी घ्यायच्या. एक दिवस कोल्हापूरला सुरु असलेल्या एका शूटनंतर निवेदिता सराफ मुंबईला जाण्यासाठी निघाल्या. तर अशोक सराफ मात्र आणखी काही दिवस तिथेच थांबणार होते. मग जाण्यापूर्वी दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. नंतर जाण्याची वेळ आली असता निवेदिता सराफ अगदी जड मनाने तिथून निघाल्या. तेव्हा मामांच्या मनात असं आलं की दरवाज्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या एकदा तरी मागे वळून बघणार. अन् अगदी मामांच्या मनात होतं तेच झालं. निवेदिता यांनी मागे वळून बघितलंच. तेव्हा तिचंही आपल्यावर प्रेम आहे हे मामांना समजलं.'
हा किस्सा ओळखीचा वाटतो ना? शाहरुख खान-काजोलचा (Shahrukh Khan-Kajol) सुपरहिट सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मध्ये अगदी असाच सीन दाखवण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनवर सिमरन आणि राज यांच्या वाटा वेगळ्या होत असताना राज मनात म्हणतो,'जर ती तुझ्यावर प्रेम करत असेल तर एकदा मागे वळून नक्की बघेल...पलट...पलट!! सिमरन मागे वळून बघते आणि हसते. या सिनेमातील अनेक सीनपैकी हा सीन प्रेक्षकांनी उचलून धरला होता.
अशोक सराफ यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. ज्यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टी आहे त्यापैकी एक म्हणजे अशोक सराफ. या महत्वाच्या क्षणी सर्वांनाच मामांचा जीवलग मित्र लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण झाली.