अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:28 IST2024-05-24T13:27:25+5:302024-05-24T13:28:47+5:30
मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. यावर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. यंदा १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले. यंदाच्या वर्षी १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.
प्रशांत दामलेंनी कलाकारांना केलं हे आवाहन
नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे.