‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायले हे गाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:02 PM2018-09-18T18:02:49+5:302018-09-18T18:04:11+5:30
अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे.
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे.
सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन या गाण्याविषयी सांगतात, “सागर खेडेकर यांनी लिहिलेल्या गीताला सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतके चपखलपणे बसवले आहे की, गाणे पटकन ओठांवर रूळते. आम्ही चित्रीकरणादरम्यान हे गाणे सतत गुणगुणत होतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की, सिनेरसिकांनाही हे गाणे खूप आवडेल.”
या गाण्याविषयी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सांगतात, “या अगोदर सगे-सोयरे आणि कळत-नकळत सिनेमांमध्ये मी गाणी गायली आहेत. त्यामुळे हे गाणे रेकॉर्ड होताना त्या गाण्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच, शिवाय हे हळदीचे गाणे असले तरी मिश्किल बाजाचे असल्याने ते आमच्या आवाजात शोभते आहे.”
अनिकेत विश्वासराव गेल्या अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याने अभिनयक्षेत्रात आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. त्याच्यासाठी गायनाचा अनुभव हा नवीन होता. अशोक सराफ यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाल्याने तो खूपच खूश आहे. त्याच्या या अनुभवाविषयी तो सांगतो, “माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोकमामांसोबतच्या सिनेमामधून झाला आणि आता पार्श्वगायनात डेब्यू होतानाचे गाणेही अशोक मामांसोबतच आहे. त्यामुळे मी स्वत:ला लकी समजतोय.”
पिरॅमिड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण आणि अतुल गुगळे यांची निर्मिती असलेला सचिन संत यांची सहनिर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट आणि त्यांनी गायलेले हे चंद्रमुखी गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.