अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसं पडलं? नेहमी शर्टाची वरची दोन बटणं उघडी का ठेवायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:50 AM2021-06-04T10:50:37+5:302021-06-04T10:51:19+5:30
Ashok Saraf Birthday Special : आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणा-या अशोक मामांचा आज वाढदिवस. वाचा, रंजक किस्से
अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले. अनोखी विनोद शैली आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणा-या अशोक मामांचा (Ashok Saraf Birthday )आज वाढदिवस. होय, अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत सारेच जण ‘मामा’ नावानं हाक मारतात. पण का? या मागचे कारण कदाचित अनेकांना माहित नसावे. त्यामागे एक रंजक किस्सा आहे.
कॅमेरामॅनची मुलगी अन् मामा...
तर एका सिनेमाच्या सेटवर अशोक सराफ यांना मामा हे नाव पडले. या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामॅन होता. त्याच्या मुलीनेच अशोक सराफांना मामा हे नाव दिले. प्रकाश शिंदे अनेकदा त्याच्या मुलीला घेऊन येत असते. ती लहान चिमुकली सतत अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत असे आणि हे अशोक मामा, त्यांना अशोक मामा म्हणायचे हो, असे वडिल तिला दरवेळी सांगायचे. ती चिमुरडी नंतर अशोक सराफांना मामा म्हणून हाक मारू लागली. मग काय, सेटवरील सर्वच जण त्यांना मामा अशी हाक मारु लागले. पुढे हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारु लागलं.
म्हणून अशोक सराफ शर्टची पहिली दोन बटणं उघडी ठेवायचे...
अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सुरूवातीच्या सिनेमातील त्यांच्या लूकवर नजर टाकली तर नेहमी त्यांच्या शर्टाची पहिली दोन बटणं उघडीच असल्याचे पाहायला मिळते. त्यामागेही कारण होते.
एकतर शर्टाची पहिली दोन बटणं उघडी ठेवायची तेव्हा फॅशन होती. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर पर्यंत शर्टाची बटणं लावली की अशोक मामांना अवघडल्यासारखेही व्हायचे. त्यामुळे दोन बटणं मोकळी ठेवणे त्यांना जास्त कंम्फर्टेबल वाटायचे. पुढे हीच त्यांची स्टाईल बनली आणि त्यांच्या अनेक सिनेमात अशोक मामा अशाच अवतारात दिसले.
बँकेत करायचे काम...
चित्रपटसृष्टीत येण्याआधी अशोक सराफ बँकेत काम करत होते हे खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं त्यांनी बँकेत काम केले. त्यांच्या बँकेतील नोकरीविषयी त्यांनी स्वत:च लोकमतशी बोलताना सांगितले होते.
अशोक सराफ यांनी सांगितले होते की, मी 1974 ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत जाणे जमायचे नाही. 1978 ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. काही महिने ऑफिसला गेलेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ मंडळी घरी आली. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली होती.