महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'एवढ्या लवकर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 09:59 AM2024-01-31T09:59:56+5:302024-01-31T10:06:55+5:30
Ashok saraf: महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ भारावून गेले आहेत.
मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळणार असल्याचं घोषित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्येच आता अशोक सराफ यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी TV 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत संमिश्र भावना असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अशोक सराफ?
"मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. किंवा, मला माझं काम तेवढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय त्यामुळे मी नि:शब्द झालोय. कारण, ज्यांना पुरस्कार मिळाला ते थोर लोकं आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलं आहे याची जाणीव मला व्हायला लागली आहे. तुम्ही ती मला करुन दिली हे मी कधीच विसरणार नाही", असं अशोक सराफ म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मी अतिशय भारावून गेलो आहे. या सगळ्यामुळे मला आणखी काहीतरी चांगलं आणि वेगळं करायचंय या जाणीवेने मी आता बांधलो गेलो आहे. मी सिलेक्टेड काम करतोय. पण, निश्चितच मी काम करत राहणार. तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे."
दरम्यान, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी मी निवेदिताला सांगितलं त्यावेळी ती आनंदाने जोरात ओरडली, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं.सोबतच त्यांनी निवेदिता यांचेही आभार मानले. यावेळी त्यांनी पत्नी निवेदिता सराफ यांचीदेखील प्रतिक्रिया सांगितली. निवेदिता यांनाच सर्वात आधी याबाबत फोन आला. त्यामुळे त्या आनंदाने जोरात ओरडल्या असं अशोक सराफ म्हणाले. यावेळी त्यांनी निवेदिता सराफ यांचेदेखील आभार मानले.