महेश कोठारेंवर नाराज आहात का? अशोक सराफ म्हणाले - "मला त्याच्या सिनेमात भूमिकाच नव्हती त्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:58 IST2025-02-26T15:58:24+5:302025-02-26T15:58:44+5:30
अशोक सराफ महेश कोठारेंवर नाराज आहेत का असं प्रश्न विचारण्यात आला त्यावर अशोकमामांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या (ashok saraf, mahesh kothare)

महेश कोठारेंवर नाराज आहात का? अशोक सराफ म्हणाले - "मला त्याच्या सिनेमात भूमिकाच नव्हती त्यामुळे..."
लोकमत फिल्मीच्या No Filter या शोमध्ये अशोक सराफ यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ते अनेक विषयांवर व्यक्त झाले. लोकमतच्याच एका मुलाखतीत अशोक माझ्यावर थोडा नाराज आहे, असं महेश कोठारे म्हणाले होते. याविषयी अशोकमामांना विचारलं असता ते म्हणाले की, "मी महेशवर नाराज आहे? नाही! महेशच्या फिल्ममध्ये मला भूमिकाच नसेल तर मी कसं करणार ना!"
...म्हणून अशोकमामांनी महेशसोबत केलं नाही काम
अशोक सराफ पुढे म्हणाले, "कॅरेक्टर लिहिली जाईल तर मी त्याच्यात काम करेल. पण रोल नव्हता. मग कठीतरी त्याला माझ्यासाठी रोल आहे असं वाटलं असेल तर त्याने मला भूमिका दिली. मी पहिलं त्याच्यासोबत धूमधडाका सिनेमा केला. त्या सिनेमात महेशची लक्ष्मीकांत बेर्डेसोबत जोडी जमली. दोघांचं टायमिंग जमलं. पुढे मला असा काही रोलच नव्हता. पण त्याच्याबद्दल मला अजिबात नाराजी नाही. त्यामुळे त्यालाही असं वाईट वाटण्याचं कारण नाही. त्याच्याकडे मला देण्यासारखा रोल नव्हता. ठीकेय! जेव्हा महेशने नंतर एक पिक्चर केला तो म्हणजे शुभमंगल सावधान. त्या सिनेमात मला रोल होता त्यामुळे मी केला. त्यामुळे महेशकडे मी दोनच पिक्चर केले."
याशिवाय मराठी इंडस्ट्रीत लक्ष्मीकांत बेर्डे-महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर-अशोक सराफ अशी मित्रांमध्येच गटबाजी दिसली का? याविषयी विचारलं असता अशोक सराफ म्हणाले, "गटबाजी केली नाही तर गटबाजी झाली. सचिन आणि माझं टायमिंग जुळलं तर दुसरीकडे लक्ष्मीकांतचं महेशसोबत टायमिंग जुळलं. आता दोन-तीन कॉमेडीयन एकत्र धूमधडाका सारख्या सिनेमातच दिसू शकतात. बाकी कोणत्या सिनेमात असं काही सापडलं नाही."
"आता जो रोल लक्ष्मीकांत बेर्डेशी जुळत असेल तर महेश त्यालाच तो रोल देणार ना? कारण तो महेशसाठी तसा उपलब्ध होता. माझ्याकडे बाकीचेही पिक्चर्स होते. बाकी गटबाजी असं काही नाही. लोकांना वाटण्याची शक्यता आहे पण तसं काही नाही."