अशोक सराफ किती आध्यात्मिक आहेत? म्हणाले - "मला वाटतं देव म्हणजे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:03 PM2024-08-04T15:03:54+5:302024-08-04T15:04:11+5:30
अशोक सराफ यांनी देव आणि आध्यात्म यावर भाष्य केलं
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या खास मतांसाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असतं ही त्यांची शैली. यातच अशोक सराफांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांना अध्यात्म आणि देवावर विश्वास आहे का हे विचारण्यात आलं त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
अशोक सराफ यांचा आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा 'लाईफलाईन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी डॉक्टरांची भुमिका साकारली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांना 'अब दवा की जरूरत नहीं दवा की जरूरत है' या वाक्यावर तुमचं काय मत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अशोक सराफ म्हणाले "हे सगळं फिल्मी आहे. असं नसतं. डॉक्टर हे शेवटपर्यंत प्रयत्न करतात. डॉक्टर कधी कर्तव्यापासून मागे हटत नाहीत. हे जे लोक रुग्णालयात मारामारी करतात, ते फार वाईट आहे. डॉक्टरांनी काय केलं आहे, हे ते लक्षात घेत नाहीत. कारण, त्यांना ते कळतच नाही".
तुमचा अध्यात्म आणि देवावर किती विश्वास आहे, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, "माझा देवावर विश्वास आहे. मला वाटतं देव म्हणजे एक काहीतरी शक्ती आहे. जी कधीतरी काहीतरी करुन जाते. जी तुम्हाला मदत करते. पण आपण ती निश्चित काय आहे हे सांगू शकत नाही. विधींवर माझा विश्वास नाही. देवाचं तुम्ही हे करा, ते करा, असं मला वाटतं नाही. मी भक्तीपुर्वक देवाला हात जोडेल".
डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळत आहे. 'लाईफलाईन'मध्ये अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.