अशोक सराफ पहिल्यांदाच दिसणार 'या' भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:31 PM2018-08-13T15:31:49+5:302018-08-14T06:00:00+5:30
अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. ह्या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगूरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल.
सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांतून रोमँटिक भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्या आगामी ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत.‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटातल्या अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेचे नुकतेच पोस्टर लाँच झाले आहे.
अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेविषयी चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणतात, “अशोक सराफ ह्यांची ओळख कॉमेडीचा बादशाह आहे. जवळजवळ तीन दशक आपण मराठी सिनेमांतून त्यांचा रोमँसही पाहत आलोय. अशावेळी कॉमेडी आणि रोमँस दोन्हीचे गुरू असलेल्या अशोक सराफ ह्यांना ह्या मॅड कॉमेडी सिनेमातून ‘लव्ह गुरू’च्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.”
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “ अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. ह्या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगूरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल.”
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भूषण कडू आणि अशोक सराफ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.
अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीत सगळे अशोक मामा या नावानेच ओळखतात. अशोक सराफ यांना सगळे मामा या नावानेच हाक का मारतात याविषयीचा एक रंजक किस्सा आहे. अशोक सराफ यांनी पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे अशोक याच नावाने हाक मारायचे. पण अशोक सराफ यांना नंतरच्या काळात सगळेच अशोक मामा याच नावाने हाक मारतात.
अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेमुळे सगळे मला मामा अशी हाक मारायला लागले. एका चित्रपटाचे कॅमेरामन प्रकाश शिंदे नावाचे गृहस्थ होते. त्यांच्यासोबत नेहमीच त्यांची मुलगी सेटवर यायची. तिने मला अशोक मामा बोलायला सुरुवात केली आणि तिथून माझे नाव अशोक मामा असेच पडले.