अश्विनी भावेंनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना दिले हे खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:32 PM2019-03-09T16:32:27+5:302019-03-09T16:44:01+5:30
बऱ्याच काळानंतर महिला दिनाच्याच आठवड्यात मुंबईत असलेल्या अश्विनी भावेंनी आगळ्या पद्धतीने आंततराष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट केला.
मराठीसह हिंदी सिनेमात १९९० च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्या सध्या मुंबईत आल्या आहेत. बऱ्याच काळानंतर महिला दिनाच्याच आठवड्यात मुंबईत असलेल्या अश्विनी भावेंनी आगळ्या पद्धतीने आंततराष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट केला.
समाजसेवेत नेहमीच रस असलेल्या आणि दरवर्षी समाजसेवेत पुढाकार घेऊन काही धनराशी समाजाला अर्पित करणाऱ्या अश्विनी भावेंनी नुकतीच रायगडमधल्या जांभूळपाडा गावाला भेट दिली. जांभूळपाड्यातल्या गरीब आणि गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांनी या महिलांना शिलाई मशिन्स गिफ्ट दिल्या. याविषयी अश्विनी भावे सांगतात, “जांभूळपाड्यात काम करणाऱ्या ‘सुधागड हितवर्धिनी सभा’ या संस्थेशी मी गेली दोन वर्ष निगडीत आहे. यंदा मी महिला दिनाच्या वेळी योगायोगाने मुंबईत होते. म्हणूनच जांभूळपाड्यात स्वत: जाऊन तिथल्या महिलांसोबत वेळ घालवावा असं मला वाटलं आणि तिथल्या महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं म्हणून मी त्यांना शिलाई मशीन भेट म्हणून दिली आहे.”
अश्विनी भावे पर्यावरण रक्षणासाठीही नेहमी पुढाकार घेताना दिसतात. गेल्या वर्षी महिला दिनी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या १५ अभिनेत्रींना रोपं भेट म्हणून दिली होती. तर यंदा त्यांनी मराठी सिनेसृष्टीतल्या १० पुरुष कलावंताना रोपं भेट दिली. त्यासोबतच हस्तलिखीत पत्रही पाठवली.
अश्विनी भावेंनी या पत्रात लिहिले आहे की, “एका स्त्रीने एका पुरुषाला महिला दिनाच्या शुभेच्छा देणे ही थोडी चाकोरी बाहेरची गोष्ट आहे... पण त्यातच धमाल आहे ना... यावेळी काहीतरी वेगळं करावं असं वाटलं म्हणून ही आठवण भेट दिली. हे रोपटे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या स्त्रीला द्या.”
अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा', 'कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' आणि सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह, बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.