जगणं सोडता येत नाही म्हणत व़डिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे करतेय शेतात काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 06:38 PM2021-06-07T18:38:27+5:302021-06-07T18:39:38+5:30
अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, शेतकऱ्याची लेक... जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही.
'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली होती. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र तरी देखील अश्विनी खचली नाही. तिने आपले दु:ख बाजूला सारत शेतकामाला सुरुवात केली आहे.
अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, शेतकऱ्याची लेक... जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे, हीच नानांची प्रेरणा व शिकवण.
अश्विनीची ही पोस्ट पाहून तुम्ही अनेकांना प्रोत्साहन देत आहात असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
अश्विनीने तिच्या वडिलांच्या निधनाच्या काही दिवसानंतर इन्स्टाग्रामवर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल संताप व्यक्त केला होता. तसेच तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तुम्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहितच धरता का, असा सवालही केला होता.