कॅन्सरशी झुंज देताना अतुल परचुरेंवर झाले होते चुकीचे उपचार, मुलाखतीत केलेला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:13 PM2024-10-14T20:13:00+5:302024-10-14T20:14:11+5:30
अतुल परचुरेंनीच सांगितलेली सर्व घटना
दिलखुलास, रसिकांना हसवणारे व्यक्तिमत्व मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या केवळ ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांना संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी आहे. रंगभूमी असो किंवा टीव्ही सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी उत्तमोत्तम काम केलं. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावर मात करत ते बरेही झाले होते. मात्र ती कॅन्सरशी दिलेली झुंज, तो काळ त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितला होता. तेव्हा त्यांच्यावर चुकीचे उपचार झाल्याचंही ते म्हणाले होते.
कॅन्सरवर मात केल्यानंतर अतुल परचुरेंनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, "माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझीलंडला फिरायला गेलो होतो. पण तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भीती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो, तू ठीक होशील असं उत्तर दिलं."
पुढे ते म्हणाले, "उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखी खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो.या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले."
या सर्व प्रकारानंतरही अतुल परचुरे यांनी हार मानली नाही. ते लढले. त्यांना कुटुंबाची, मित्रपरिवाराची साथ लाभली. मात्र आजाराने पुन्हा डोकं वर काढलं. यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगी आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला हा मोठा धक्का आहे.