‘बाबा’ चित्रपट दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 06:10 PM2019-08-02T18:10:44+5:302019-08-02T18:13:33+5:30
या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत.
‘बाबा’ हा चित्रपट संपूर्ण देशभर आज प्रदर्शित झाला असून त्याला चित्रपट समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाची सजग आणि मार्मिक अशी हाताळणी यामुळे चित्रपट सर्वत्र गाजत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाला लोकांची वाहवा मिळत असतानाच मराठी चित्रपट ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज २०२०’मध्ये दाखवला जाणार आहे. परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या निर्माती मान्यता दत्तने सांगितले की, “आम्हांला अभिमान वाटतो की आमची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ गोल्डन ग्लोब्जमध्ये दाखवला जाणार आहे. आमचा यापुढे अर्थपूर्ण आणि तरीही मनोरंजन करणारा चित्रपट बनवण्याचा मानस आहे. ‘बाबा’ही त्याच पठडीतील चित्रपट आहे. मला पूर्ण आशा आहे की या चित्रपटाला प्रेक्षकांची साथ आणि त्यांचे प्रेम मिळेल.”
“बाबा’ हा कोकणातील एका अत्यंत सुंदर अशा गावात आकाराला येणारी कथा पडद्यावर साकारतो. चित्रपटाचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाशी हा चित्रपट जोडला जाईल. आमचा पहिला चित्रपट ‘बकेट लिस्ट’प्रमाणे ‘बाबा’या चित्रपटालाही तेवढेच यश मिळेल, अशी मला पूर्ण खात्री आहे. आम्ही आणखीनही असे अनेक चित्रपट बनविण्याची योजना आखली आहे. त्यात प्रादेशिक, मुख्य धारेतील चित्रपटांचा समावेश असून ते मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असतील.”