'बबन' फेम मराठी अभिनेत्रीची गगनभरारी! तेलुगु सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण, दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:39 IST2025-03-20T17:38:32+5:302025-03-20T17:39:48+5:30
आणखी एक मराठी अभिनेत्री साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज आहे. बबन सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रांजली कंझारकरने तेलुगु सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण केलं आहे.

'बबन' फेम मराठी अभिनेत्रीची गगनभरारी! तेलुगु सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण, दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत
असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी मराछी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूड आणि टॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवली आहे. देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनंतर आता आणखी एक मराठी अभिनेत्री साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज आहे. बबन सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रांजली कंझारकरने तेलुगु सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण केलं आहे. 'डॉली - स्टोरी ऑफ अ वॉरीअर' असं या तेलुगु सिनेमाचं नाव आहे.
'डॉली - स्टोरी ऑफ अ वॉरीअर' या चित्रपटात प्रांजलीने बॉक्सरची भूमिका साकारली आहे. डॉली या चित्रपटाचे दिग्दर्शक के के किरण कुमार दुर्गा असून कथा - संवाद ही त्यांनीच लिहिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती के क्रांथी यांनी केली असून संगीत माही कोंडेती यांचे आहे. अभिनेत्री प्रांजली कंझारकर आणि अभिनेता के के किरण कुमार दुर्गा हे प्रमुख भूमिकेत आहेत. तर टेम्पर वामशी, रमा देवी, के के किरण कुमार दुर्गा, श्रीधर रेड्डी, यशवंत कोसी रेड्डी हे कलाकार या चित्रपटात झळकले आहे. डॉली चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हैदराबाद येथे झाले आहे.
अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने या आधी बबन, एकदम कडक, मनोमनी असे मराठी चित्रपट तर जॅकी श्रॉफ यांच्यासोबत चिडीया उड या हिंदी वेबसिरीजमध्ये काम केले आहे. आता 'डॉली - स्टोरी ऑफ अ वॉरीअर' या तेलुगू चित्रपटामुळे तीची साऊथ इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण होत आहे. अभिनेत्री प्रांजली डॉली चित्रपटाच्या अनुभवाविषयी सांगते, "मला करोना संपल्यानंतर डॉली चित्रपटाविषयी विचारण्यात आलं. मी या चित्रपटाची स्टोरी ऐकली तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे लॅंग्वेज बॅरीअर नाही आहे. म्हणून मी लगेचच होकार दिला. बॉक्सरच्या भूमिकेसाठी मला फिजीकली स्ट्राँग राहणं गरजेचं होतं. या चित्रपटासाठी मी एक वर्ष ट्रेनिंग घेतलं. माझ्यासाठी चित्रपटाचा हा अनुभव ड्रीम कम ट्रू होता."
पुढे ती बॉक्सरच्या भूमिकेसाठी घेतलेल्या ट्रेनिंगविषयी सांगते, "डॉली चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबादमध्ये होतं. आम्ही जिथे ट्रेनिंग करायचो. त्याच जीममध्ये आम्ही चित्रीकरण केलं. मी या भूमिकेसाठी ८ किलो वजन कमी केले. साइन लॅंग्वेज, तसेच दोन्ही हाताने लिहायला शिकले. १०० वर्ष जुन्या असलेल्या मंदिरात या चित्रपटातील गाण्यांचं शूट झालं. क्लायमॅक्स आणि फाइटिंग सीन एकाचवेळी भरपावसात शूट केले. मी पहिल्याच तेलुगू चित्रपटात एकाच भूमिकेत खूप गोष्टी शिकले. दिग्दर्शक के के किरण कुमार दुर्गा आणि टीमसोबत काम करताना खूप मजा आली. डॉली चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. तुमचं असंच प्रेम माझ्या सर्व चित्रपटांवर राहो हीच इच्छा."