'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर डंका, १० दिवसांची कमाई पाहून केदार शिंदेही भारावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:11 IST2023-07-10T18:10:17+5:302023-07-10T18:11:40+5:30
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला तुफान प्रतिसाद, १० दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर डंका, १० दिवसांची कमाई पाहून केदार शिंदेही भारावले, म्हणाले...
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचे सिनेमागृहातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत तब्बल २६.१९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई पाहून दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर कमाईचे आकडे शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
"नि: शब्द...काही घटना आयुष्यात घडतात त्या फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यावर निर्विवाद वर्चस्व आहे ते...मायबाप प्रेक्षकांचं. त्या परमेश्वराचा आशीर्वाद...हा सिनेमा आता आमचा राहीला नाही. तो प्रेक्षकांचा झाला आहे. अनेक विक्रम प्रेक्षकांच्या नावे या सिनेमाने निर्माण करावेत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. श्री सिध्दीविनायक...," असं केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केदार शिंदेंच्या या पोस्टवर चाहते व सेलिब्रिटींनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा परब व वंदना गुप्ते या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.