केदार शिंदेंकडून 'बाईपण भारी देवा'साठी पुरुषांना भन्नाट ऑफर, चित्रपट पाहता येणार फक्त 'इतक्या' रुपयांत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:15 PM2023-08-08T19:15:11+5:302023-08-08T19:18:23+5:30
'बाईपण भारी देवा'चं तिकीट मिळणार फक्त 'इतक्या' रुपयांत, कुठे आणि कसं? जाणून घ्या
बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने खासकरुन महिला प्रेक्षकवर्गाच्या मनात घर केलं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी महिलावर्ग सिनेमागृहांत गर्दी करत आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यांवर महिला सिनेमागृहांत ठेका धरताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिलावर्गाकडून या चित्रपटाला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहून दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत. आता त्यांनी पुरुषांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
'बाईपण भारी देवा' चित्रपट आता पुरुषांना फक्त १०० रुपयांत पाहता येणार आहे. चित्रपटाच्या टीमकडून ही भन्नाट ऑफर पुरुषांना देण्यात आली आहे. या चित्रपटाचं तिकीट कमी किमतीत प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारपासून हा सिनेमा फक्त १०० रुपयांत चित्रपटगृहांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. केदार शिंदेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
राजामौलींच्या चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार खलनायकाची भूमिका, म्हणाले, "त्यांनी मला पाहिल्यावरच..."
"हा सिनेमा "तीने" डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय..." असं म्हणत केदार शिंदेंनी ही पोस्ट शेअर केली आहे.
जेव्हा साडी नेसून आलेल्या बिग बींची राजेश खन्ना यांनी उडवलेली खिल्ली, नेमकं काय घडलं होतं?
'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, दीपा परब, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींनी काकडे सिस्टर्सची भूमिका साकारली आहे.