'बाईपण..'च्या खऱ्या 'सुपर-सिस्टर्स' ! 'या' सहा जणींवरून सुचली सिनेमाची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:04 PM2023-07-28T19:04:04+5:302023-07-28T19:05:28+5:30
Baipan bhari deva: 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची कथा लेखिका वैशाली नाईक यांना लिहिली असून ही कथा नेमकी कशी सुचली हे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
अभिनेता, दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांचा 'बाईपण भारी देवा' (baipan bhari deva) या सिनेमाने सध्या अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. ६ बहिणींची कथा सांगणाऱ्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी सिनेमा ठरला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत या सिनेमाविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अगदी त्यातील गाण्यांपासून ते कथानकापर्यंत. यामध्येच सध्या या सिनेमाची कथा लेखिका वैशाली नाईक यांना कशी काय सुचली याविषयी चर्चा रंगली आहे. या प्रश्नाचं उत्तर वैशालीनेच दिलं आहे.
'बाईपण भारी देवा' या सिनेमाची कथा लेखिका वैशाली नाईक यांना लिहिली असून ही कथा नेमकी कशी सुचली हे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. सोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
कोणत्या सहा बहिणींवर आधारित आहे हा सिनेमा?
'बाईपण भारी देवा' या सिनेमाची कथा ही वैशाली यांच्या जवळच्या नात्यातील बहिणींची आहे. त्यामुळे ही कथा पूर्णपणे काल्पनिक नसून त्यात थोडा वास्तववादीपणाचा टचदेखील आहे. 'बाईपण भारी देवा चित्रपटातील या खऱ्या सहा नायिका ‘जिथून या कथेची सुरुवात होते’', असे म्हणत त्यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत. वैशाली यांच्या डोक्यात ही कल्पना होती ही कल्पना त्यांनी केदार शिंदेना सांगितली. कथा आवडल्यामुळे त्यांनी सिनेमा करण्यास होकार दिला आणि सुपरडुपर ठरलेला बाईपण भारी देवा सिनेमा उदयास आला. याविषयी केदार शिंदे यांनी एक पोस्टदेखील शेअर केली होती.
काय आहे केदार शिंदेंची पोस्ट?
"हे जे छोटंसं बाळ दिसतय, ते छोटा पॅकेट बडा धमाका आहे. @naikvaishali 2018 मध्ये एका हिंदी शो च्या award function मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. ही हिंदी टेलिव्हिजन शो ची उत्तम लेखिका आहे. मला येऊन म्हणाली की, माझ्याकडे एक सिनेमाचं कथानक आहे. मी म्हटलं की, हिंदी सिनेमा मी करत नाही. म्हणाली, कथा मराठी सिनेमासाठी आहे. तेव्हा समजलं की, ही हिंदी भाषिक नसून नाईकांची वैशाली आहे. दुसऱ्या दिवशी भेटलो आणि तीने मला ६ बहिणीची गोष्ट ऐकवली. ऐकताच मी प्रेमात पडलो. तिथेच ती मला रीलेट झाली. खरतर मला सख्खी बहिण नाही. पण कुठेतरी ते कॅरेक्टर्स मला माझ्या मावशी, आत्या, आई, आजी सारखे वाटले. मग तो लिखाणाचा उत्तम प्रोसेस. नवीन नवीन सुचवून मी कंटाळलो नाही आणि लिहून लिहून ती नाही. तीचा पहिल्या सिनेमात तीने जी कामगिरी केली ती थक्क करणारी आहे. #बाईपणभारीदेवा तीच्यासाठी जन्म आहे. मला ठाऊक आहे की हे बाळ खुप मोठं होणार आहे. कारण या बाळाचे पाय पाळण्यात दिसले आहेत. गेली ३ वर्षे जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी थांबला तेव्हा तीची घालमेल मला जाणवत होती. उगाचच मला गिल्टी वाटायचं. पण वैशाली मी म्हणालो होतो, सिनेमा येणार आणि तो चिरकाल स्मरणात राहणार. मी माझा शब्द पुर्ण केला. जसा तू माझ्यासाठी शब्द शब्द लिहिलास!!! आता जबाबदारी वाढली आहे. लवकरच भेटू. दरम्यान, या सिनेमात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे.