...अन् आजीबाईंनी थिएटरमध्येच घातला पिंगा, 'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:21 IST2023-07-10T19:17:28+5:302023-07-10T19:21:26+5:30
'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यान आजीबाईंनी पिंगा घालायला सुरुवात केली अन्...; चित्रपटगृहातील व्हिडीओने वेधलं लक्ष

...अन् आजीबाईंनी थिएटरमध्येच घातला पिंगा, 'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा Video व्हायरल
बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे सिनेमागृहांतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथील सिनेमागृहातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये आजीबाई गाणं म्हणून पिंगा घालताना दिसत आहेत. 'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी आजीबाईंचं कौतुक केलं आहे.
'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब व वंदना गुप्ते या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. सहा बहिणींची हटके गोष्ट सांगणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.