मराठमोळी अभिनेत्री गाजवतेय गुजराती रंगभूमी, प्रेक्षकांनीही घेतलं डोक्यावर, म्हणाली...
By मयुरी वाशिंबे | Published: April 16, 2024 07:00 AM2024-04-16T07:00:00+5:302024-04-16T07:00:00+5:30
अभिनेत्रीनं मराठी चित्रपटांसह ओटीटी माध्यमावरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. रंगभुमी
बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचं गुजरातीमध्ये 'एक छोकरी साव अनोखी' असं रुपातंर करण्यात आलं आहे. 'एक छोकरी साव अनोखी' अर्थात एक मुलगी निव्वळ अनोखी या गुजराती नाटकातून मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आता गुजराती प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडतं आहे. हे नाटक गुजराती प्रेक्षकांना खूप पसंत पडलंय. गुजराती प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या भाग्यश्री मिलिंदनं 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली.
अनोखीच्या भूमिकेसाठी काय तयारी केली ?
'अनोखी हे माझ्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. गुजराती माझी मातृभाषा नाही. थोड फार गुजराती समजायचं. गुजराती भाषेचा लहेजा पकडण्यासाठी मी सतत सराव केला. गुजराती सिनेमे पाहिले, कविता ऐकल्या. प्रेक्षकांना नाटक पाहताना एक मराठी मुलगी गुजरातीमध्ये बोलतेय असं वाटणार नाही, यासाठी विशेष मेहनत घेतल्याचं ती म्हणाली. यावेळी नाटकात सर्व गोष्टी पायानं करायचा असल्यानं ती व्यक्तीरेखा थोडी आव्हानत्मक असल्याचंही तिनं सांगितलं.
मराठी आणि गुजराती या दोन्हीमध्ये काम केलं आहेस, तर प्रेक्षकांमध्ये काय फरक वाटतो ?
'मराठी आणि गुजराती प्रेक्षकांचं नाटकावरचं प्रेम हे सारखचं आहे. मराठी आणि गुजरातीमध्ये नाटकप्रेमी असंख्य माणसे आहेत. मला गुजराती प्रेक्षकांचा खूप चांगला अनुभव आला आहे. 'एक छोकरी साव अनोखी' या नाटकात अनेक छटा आहेत त्यामुळे प्रेक्षकांना नाटक पाहताना भरुन येतं. एका प्रयोगाला काही अंध शाळेतील मुली आल्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या बसमध्ये गेले होते. तेव्हा नाटक खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींना दिसत नव्हतं, पण, त्यांच्या पर्यंत भावना पोहचल्या होत्या. ती माझी खूप छान आठवण आहे'.
अनोखी आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे ?
'साम्य एकच आहे की माझ्यामध्ये पण ती जिद्दी आहे. माझ्यामध्येही सकारात्मकता आहे. कितीही वाईट काळ जरी आला तरीही त्यातून बाहेर पडणं, त्याच विचारांमध्ये न राहणं, आपला रस्ता शोधणं ही जी अनोखीमधील गोष्ट आहे, ती माझ्यामध्ये आहे. मी तिच्याकडून शिकले सुद्धा की, कितीही मेहनत करावी लागली तरी करा. कारण तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता'.
अनन्या नाटक आणि चित्रपट यापैकी काय तु पाहिलं आहेस, कुणाचं काम तुला जास्त आवडलं?
'मी दोन्ही पाहिले आहेत. दोघींची काम उत्तम आहेत. प्रत्येक कलाकार हा त्याच्या पद्धतीनं त्या व्यक्तीरेखेत एक वेगळेपण आणत असतो. त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. दोघींची कामे मला आवडली आहेत'.
'अनन्या' नाटकांचं रुपांतर असलेल्या 'एक छोकरी साव अनोखी' नाटकाचे गुजराती भाषेत जोरदार प्रयोग होत आहेत. मराठी प्रेक्षकानंतर भाग्यश्रीनं आपल्या निरागस हावभावाने आणि दमदार अभिनयाने तिने गुजराती रसिकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या नाटकाचा १०० वा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.