बालगंधर्वांची ‘लुगडी’ स्त्रियांतही होती प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:22 PM2023-10-21T12:22:53+5:302023-10-21T12:23:48+5:30

स्त्री वेशात ते हळदीकुंकवाला जाऊन आले आणि तिथल्या कुणीही त्यांना ओळखले नाही, ही कथा आतापर्यंत अनेकांनी वाचली असेल. 

Balgandharva's 'lugdi' was also famous among women! | बालगंधर्वांची ‘लुगडी’ स्त्रियांतही होती प्रसिद्ध!

बालगंधर्वांची ‘लुगडी’ स्त्रियांतही होती प्रसिद्ध!

जसा जन्मतो तेज घेऊन तारा! जसा मोर घेऊन येतो पिसारा! तसा येई घेऊन कंठात गाणे! असा बालगंधर्व आता न होणे! - गदिमांनी ज्यांच्या वर्णनासाठी ही शब्दयोजना केली ते नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेले एक देखणं आणि सुरेल स्वप्न होते, असे मानले जाते. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले रसिक बालगंधर्वांच्या अक्षरशः प्रेमात पडलेले होते.

त्याकाळातली महाराष्ट्राची बाजारपेठ बालगंधर्वांच्या नावाच्या अनेकविध वस्तूंनी भरलेली होती. स्त्री वेशात ते हळदीकुंकवाला जाऊन आले आणि तिथल्या कुणीही त्यांना ओळखले नाही, ही कथा आतापर्यंत अनेकांनी वाचली असेल. 
त्यांच्या एरवीच्या आयुष्यातसुद्धा ते वापरीत असलेल्या अनेक गोष्टींनी त्या काळातल्या फॅशन्स ठरत असत. लोक त्यांची नक्कल करीत असत. ‘गंधर्व टोपी’, ‘गंधर्व कोट आणि ओव्हरकोट’, ‘गंधर्व पगडी’ अशा अनेक प्रकारचे कपडे घालणे, हे फॅशनेबल उच्चभ्रू लोकांकडून स्टेटस सिम्बॉल मानले जात होते! 
मोठ्या तालेवार घरातल्या स्त्रियादेखील बालगंधर्व जशी लुगडी नेसायचे तशाच प्रकारे आपली लुगडी नेसायच्या, असे सांगितले जाते. 

याच कालावधीत पाश्चात्त्य बाजारपेठेत हॉलिवूडच्या चित्रतारकांना घेऊन ‘लक्स’सारख्या साबणाच्या जाहिराती व्हायला लागल्या होत्या. हे सगळे पाश्चिमात्य जगात घडत होते, त्यावेळी आपल्याकडे मराठी प्रसारमाध्यमांतही तसेच घडत होते! त्यासाठी सेलिब्रिटी म्हणून चक्क बालगंधर्व जाहिरातीमध्ये वापरले गेले. 

‘लक्स’ने या प्रकारची भारतात जी पहिली जाहिरात केली ती १९४१ साली. ज्यात त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांना मॉडेल म्हणून घेण्यात आले होते. त्याच्या जवळपास दहा-बारा वर्षे अगोदर या प्रकारच्या जाहिरातींसाठी महाराष्ट्रात जाहिरातींसाठी वापरले गेलेले मॉडेल होते बालगंधर्व. यावरुन त्यांची लोकप्रियता लक्षात यावी!
आपण पाहत आहात ती जाहिरात गंधर्व टॉयलेट पावडरची आहे. बडोद्यामध्ये असणाऱ्या एन. फडके अँड कंपनीच्या पावडरचे नावदेखील बालगंधर्वांच्या नावावरूनच गंधर्व असे बेतलेले आहे आणि गंधर्वांचे एक अतिशय सुंदर छायाचित्र त्यामध्ये वापरले गेलेले आहे. ही जाहिरात कधी व कुठे प्रसिद्ध झाली, याचा तपशील बराच शोध घेऊनदेखील सापडू शकला नाही. वाचकांपैकी कुणाकडे तो तपशील असेल तर ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 

- दिलीप फडके, विपणनशास्त्राचे अभ्यासक,
pdilip_nsk@yahoo.com

Web Title: Balgandharva's 'lugdi' was also famous among women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.