'या' तीन गोष्टींमुळे सुनील बर्वे आजही दिसतात चिरतरुण; अखेर उघड केलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 15:56 IST2023-10-12T15:55:50+5:302023-10-12T15:56:11+5:30
Sunil barve: सुनील बर्वे यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवण्यासारखा आहे.

'या' तीन गोष्टींमुळे सुनील बर्वे आजही दिसतात चिरतरुण; अखेर उघड केलं गुपित
मराठी सिनेइंडस्ट्रीतला सगळ्यात देखणा नट म्हणून आजही लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सुनील बर्वे. मराठीसह हिंदी, गुजराथीमध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वे (Sunil barve) यांची त्याकाळी तुफान क्रेझ होती. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता तितकीच आहे. उत्तम अभिनयासह त्यांच्या गुड लुकिंग आणि स्मार्टनेसची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगते. परंतु, वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांचं तारुण्य अबाधित असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या फिटनेस आणि चिरतरुण असण्यामागचं कारण काय असा प्रश्न कायम नेटकऱ्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नुकतंच लोकमत फिल्मीच्या इंटरव्ह्यूमध्ये दिलं आहे.
तुमच्या तरुण राहण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सुनील बर्वे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, नाही, रहस्य वगैरे असं काही नाही. आई-वडिलांची देण आहे ही असंच मी म्हणेन. त्यांच्याकडूनच हे आलंय. तरुण राहण्याचं कसब किंवा गुण जो आहे तो त्यांच्याकडूनच आलाय. पण, व्यायाम करणे, अरबटचरबट न खाणे, उशीरापर्यंत जागरण न करणे या गोष्टी मी पाळल्या. त्यामुळे त्या कुठेतरी कारणीभूत असतील. आणि, मला असं वाटतं की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत लपलेलं असतं. त्यामुळे लोकांना मी त्यांच्या दृष्टीने सुंदर किंवा तरुण वाटतो तर हे तुमचं कौतुक आहे, असं सुनील बर्वे म्हणाले.
दरम्यान, सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं. त्यांनी 'आई', 'गोजिरी', 'जमलं हो जमलं', 'तू तिथे मी', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'लग्नाची बेडी', 'झोपी गेलेला जागी झाला', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'सहकुटुंब सहपरिवार' यांसारख्या अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.