...तर करीनाच्या भूमिकेत दिसली असती अमृता खानविलकर; '३ इडियट्स'च्या कास्टिंग डायरेक्टरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:35 IST2025-02-03T16:35:37+5:302025-02-03T16:35:59+5:30
३ इडियट्समध्ये अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी असणार होते. पण अचानक कास्टिंग का बदलण्यात आलं याचा खुलासा रोहन मापुस्कर यांनी केलाय

...तर करीनाच्या भूमिकेत दिसली असती अमृता खानविलकर; '३ इडियट्स'च्या कास्टिंग डायरेक्टरचा खुलासा
कोणत्याही सिनेमात कलाकारांची निवड हा महत्वाचा भाग असतो. अनेकदा सिनेमाची कथा जरी वाईट असली तरी उत्तम कलाकारांमुळे सिनेमा प्रेक्षकांना आवडतो. कलाकारांच्या निवडीसाठी पडद्यामागे कास्टिंग डायरेक्टरची महत्वाची भूमिका असते. मराठी सिनेमांपासून ते बॉलिवूडमध्ये कास्टिंगची महत्वाची जबाबदारी पार पाडणारे कास्टिंग डायरेक्टर म्हणजे रोहन मापुस्कर. (rohan mapuskar) आमिर खानच्या गाजलेल्या '३ इडियट्स' (3 idiots) सिनेमाच्या भन्नाट किस्सा रोहन यांनी सांगितलाय.
...तर ३ इडियट्समध्ये दिसली असती अमृता खानविलकर
रोहन मापुस्कर यांनी मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "खरं सांगू तर जे आता लोकप्रिय कलाकार आहेत ते सगळे ३ इडियट्सच्या ऑडिशनला आले होते. अनुष्का शर्मा, राजकुमार राव, जॅकलिन फर्नांडीस, गुरमीत चौधरी, पुलकित सम्राट, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी असे सगळे कलाकार ऑडिशनसाठी आले होते. हे सर्वजण आता त्यांच्या करिअरमध्ये स्टारपदावर आहेत."
"म्हणजे आश्चर्याची गोष्ट जी कोणाला माहित नसेल ती, म्हणजे करीना कपूरच्या आधी अमृता खानविलकरचं नाव पक्क होतं. म्हणजे मी पैशांची बोलणी करायलाही तिला फोन केलेला. शर्मनच्या रोलसाठी जितेंद्र जोशी लॉक झाला होता. सगळ्यात आधी या फिल्ममध्ये शाहरुख खान असणार होते. त्यावेळेस ही फिल्म सिक्किमच्या भागात शूट केली जाणार होती. पण स्क्रिप्ट ऐकल्यावर आमिर सरांनी होकार दिला. त्यामुळे संपूर्ण फिल्म बदलली. त्यानंतर सगळं कास्टिंग बदलायला लागलं."