​आशियायी चित्रपट महोत्सवामध्ये इराणचा ‘बर्थ डे नाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 09:44 AM2017-12-29T09:44:56+5:302017-12-29T15:14:56+5:30

वैविध्यपूर्ण चित्रपटांची आणि लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सोळाव्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची नुकतीच ...

Best Documentary on Iran's Birthday Night in Asian Film Festival | ​आशियायी चित्रपट महोत्सवामध्ये इराणचा ‘बर्थ डे नाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

​आशियायी चित्रपट महोत्सवामध्ये इराणचा ‘बर्थ डे नाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

googlenewsNext
विध्यपूर्ण चित्रपटांची आणि लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सोळाव्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. सत्यजित राय यांचा ‘जनअरण्य’ चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. द.भा.सामंत लिखित 'चंदेरी स्मृतिचित्रे' या पुस्तकाचे तसेच व्ही. शांताराम लिखित आणि मधुरा जसराज संकलित ‘शांतारामा’ या ई-बुकचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम प्रतिष्ठानच्या वतीने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर, पु.ल.देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पालंडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर, ‘चंदेरी स्मृतिचित्रे' पुस्तकाची मुखपृष्ठ व मांडणी करणारे रघुवीर कुल तसेच राजू सामंत याप्रसंगी उपस्थित होते. मागील आणि आजच्याही पिढीला ही दोन्ही पुस्तके मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण ठरतील असा विश्वास किरण शांताराम यांनी यावेळी व्यक्त केला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांना किरण शांताराम यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. चित्रपट महोत्सवांमुळे चित्रपटकर्मींना आणि त्यांच्या कलाकृतींना चांगले व्यासपीठ मिळत असून ही पर्वणी प्रत्येकाने साधायला हवी असे मत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मांडले. यंदा प्रथमच अफगाणिस्तानच्या चित्रपटाचा चित्रपट महोत्सवात झालेला समावेश, स्त्रीप्रधान चित्रपटांची वाढलेली संख्या तसेच प्रेक्षक पसंतीचा विशेष पुरस्कार याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
यंदाच्या लघुपट विभागात अनेक चांगले लघुपट रसिकांना पाहायला मिळाले. इराणचा ‘बर्थ डे नाईट’ हा लघुपट यंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असून ‘स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड’ भारताच्या अमर कौशिक दिग्दर्शित ‘आबा’ या चित्रपटाला मिळाला. प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार ‘डेस्टिनी’ या इराणी चित्रपटाला आणि त्याच्या दिग्दर्शिका अझर यांना देण्यात आला. लघुपट स्पर्धेचे परिक्षक म्हणून दिग्दर्शक संदीप सावंत, ज्येष्ठ पत्रकार गणेश मतकरी आणि लेखक अनंत भावे यांनी जबाबदारी सांभाळली. २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान रंगलेल्या या महोत्सवाला तसेच मुख्य विभागातल्या चित्रपटांच्या आयोजित चर्चासत्रालाही रसिकांचा आणि मान्यवरांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Web Title: Best Documentary on Iran's Birthday Night in Asian Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.