भाई-व्यक्ती की वल्ली चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:30 PM2019-01-08T20:30:00+5:302019-01-08T20:30:00+5:30
मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते
मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो, हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती ... पु.लंच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, परंतु ४ जानेवारी रोजी खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित भाई – व्यक्ती की वल्ली हा चित्रपट वायाकॉम18 मोशन पिक्चर्सने प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे... चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे... चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचे आहे...
लाडक्या पु.लंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर बघण्याची म्हणजेच जुना काळ पुन्हा अनुभवण्याची सुवर्णसंधी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मिळाली आहे... पु.लंच्या आयुष्याचे टप्पे, त्यांचे ऐकलेले किस्से, त्यांच्या जवळची माणस, त्यांच्या कलाकृती या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे बघायला मिळत आहेत. सागर देशमुखने साकारलेली पु.लं.ची भूमिका, इरावती हर्षेने साकारलेली सुनीता बाईची भूमिका, तसेच चित्रपटामध्ये प्रत्येकच कलाकाराने त्यांची भूमिका अतिशय उत्तमरीत्या पार पाडली आहे, चित्रपटामधील प्रसंग, त्यांची खुशखुशीत मांडणी, संवाद, तसेच सिनेमाचे संगीत या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत... हा प्रवास इथेच संपला नसून भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे...