पुण्यात Live पाहू शकता भाडिपा अनप्लग्ड, अशी करा बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:07 PM2019-07-11T12:07:00+5:302019-07-11T12:12:23+5:30
आई, मी सिरीज आणि स्टॅन्ड अप कॉमेडी व्हिडिओजने तरुणांच्या मनात घर केलेल्या, त्यांची भाषा बोलणाऱ्या 'भाडिपा'ने सुद्धा विठ्ठल नामाची पताका हाती घेत 'भाडिपा अनप्लगड' ही युनिक आयडिया समोर आणली आहे.
जून- जुलै सुरू झाला की, जसा पावसाचा वेध लागतो... तसेच वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरचे. पहिल्या पावसानंतर पेरणी करून झाल्यानंतर हे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी तयार होतात. गेल्या जवळपास ८०० ते १००० वर्षं सुरू असलेली ही वारीची प्रथा म्हणजे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वैभव आहे.
कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, केवळ विठ्ठलाच्या ओढीपायी लाखो वारकरी हजारो मैलांचा पायी प्रवास करत पंढरपूरला येतात. जीन्स-टीशर्ट मध्ये "ग्यानबा तुकाराम" करत गेल्या काही वर्षांत मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण-तरुणी सुद्धा आयटी दिंड्यांच्या स्वरूपात या उत्सवात सहभागी होताना दिसू लागले आहेत. आपापल्या परीने, आपला विठ्ठल शोधण्यासाठी आजची तरुण पिढीसुद्धा वारीकडे आकृष्ट होताना दिसते.
आई, मी सिरीज आणि स्टॅन्ड अप कॉमेडी व्हिडिओजने तरुणांच्या मनात घर केलेल्या, त्यांची भाषा बोलणाऱ्या 'भाडिपा'ने सुद्धा विठ्ठल नामाची पताका हाती घेत 'भाडिपा अनप्लगड' ही युनिक आयडिया समोर आणली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत ही भाडिपाची तरुण मंडळी येत्या आषाढी एकादशीला पुण्यात कल्ला करणार आहेत. गायक- संगीतकार सोहम पाठक त्याच्या बँड सह जुन्या अभंगरचना नव्या पद्धतीने त्याच्या 'सोहम पाठक प्रोजेक्ट' अंतर्गत सादर करणार आहेत. सोबतच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणावर आधारित आणि त्यापासून प्रेरित स्टॅन्ड अप कॉमेडी भाडिपाचे कार्यकर्ते करणार आहेत. यामध्ये सारंग साठे, मंदार भिडे, सुशांत घाडगे यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.
पुण्यात येत्या १२ तारखेला स्पेस बार, कोरेगाव पार्क येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी तिकीट दर ३५० रुपये असून यामधली मजेशीर गोष्ट अशी की, आषाढी एकादशीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असल्याने खास उपवासाचा फराळ श्रोत्यांना सर्व्ह केला जाणार आहे आणि याची तिकिटे bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
तिकिटे बुक करण्यासाठी https://in.bookmyshow.com/events/bhadipa-unplugged-ashadhi-special/ET00105475 या लिंकवर क्लिक करा.
कोणतीही परंपरा, प्रथा तेव्हाच लोकांपर्यंत पोहोचू शकते जेव्हा ती त्यांना समजणाऱ्या, आवडणाऱ्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भाडिपाची ही मंडळी नेहमीच्या त्यांच्या ढंगात विविध विषयांवर भाष्य करत आपलं म्हणणं लोकांसमोर मांडत असतात. आधुनिक जगात मिरवताना आपले संस्कार, सण अनोख्या पद्धतीने साजरी करण्याची ही जगात भारी कल्पना खरोखरच स्तुत्य आहे.