भरत जाधव आणि केदार शिंदेची या गाण्यामुळे तुटणार होती मैत्री, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:08 PM2023-12-12T17:08:00+5:302023-12-12T17:08:27+5:30
Bharat Jadhav : भरत जाधव आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता म्हणजे भरत जाधव (bharat jadhav). आजवरच्या कारकिर्दीत भरत जाधवनेनाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्यां पाहायला मिळतो. आज भरत जाधव यांचा ५०वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सही रे सही या नाटकाचा एक इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेऊयात.
भरत जाधवचे सही रे सही हे नाटक सुपरहिट झाले होते. मात्र हे नाटक अभिनेता सोडणार होता.त्याच्यात आणि केदार शिंदे यांच्यात त्यावरुन वादही झाला होता. मात्र ते नाटक सोडण्यामागे काय कारण होते आणि त्यांनी हा वाद कसा मिटवला, याबद्दल अभिनेत्याने पोस्ट शेअर करुन सांगितले होते. या पोस्टमध्ये भरत जाधवने लिहिले की, मी 'सही रे सही' सोडतोय...असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत 'गोड गोजिरी' गाण. 'श्रीमंत दामोदर पंत' मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की 'सही रे सही' मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी 'श्रीमंत दामोदर पंत' हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं.
त्याने पुढे लिहिले की, केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी 'सही रे सही' सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल. १५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो.गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि 'सही रे सही' चा इतिहास सर्वश्रुत आहे.
आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. "काही वेळेला आपलं भल आपल्याला कळतं नसत पण आपल्या माणसांना कळतं असतं." याचं विचाराने आपल्या माणसांच्या मनोरंजनासाठी आपली गोष्ट "सुखी माणसाचा सदरा" लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय..!, असे या पोस्टमध्ये लिहिले होते.