मकरंद अनासपुरेंसोबत कधी स्पर्धा होती का? भरत जाधव स्पष्टच म्हणाले- "सध्या आम्ही..."
By देवेंद्र जाधव | Updated: April 11, 2025 10:20 IST2025-04-11T10:10:12+5:302025-04-11T10:20:09+5:30
भरत जाधव यांनी मुलाखतीत त्यांची कधी मकरंद अनासपुरेंसोबत स्पर्धा होती का, या प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर दिलंय (bharat jadhav)

मकरंद अनासपुरेंसोबत कधी स्पर्धा होती का? भरत जाधव स्पष्टच म्हणाले- "सध्या आम्ही..."
भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर या त्रिकुटाने मराठी मनोरंजन विश्वातील एक काळ गाजवला आहे. या तिघांचे अनेक दर्जेदार सिनेमे मराठी प्रेक्षकांच्या चांगलेच आवडीचे आहेत. आजही हे तिघे विविध नाटक आणि सिनेमांच्या माध्यमातून मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र कामही केलंय. या काळात कधी मकरंद अनासपुरेंसोबत (makrand anaspure) भरत जाधव (bharat jadhav) यांची स्पर्धा होती का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, भरत जाधव यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
मकरंद अनासपुरेंशी स्पर्धा होती का? भरत जाधव म्हणाले-
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव याविषयी म्हणाले की, "छे छे. काही संबंध नाही. मक्याला मी त्याच्या एकांकिका स्पर्धेपासून ओळखतो. देता आधार की करु अंधार नावाची एकांकिका मक्याने केली होती. मकरंद आणि मंगेशने ती एकांकिका केली होती. तेव्हा माझं ऑल द बेस्ट नाटक चालू होतं. तेव्हापासून मी त्याला ओळखतो. मग जसजसं मक्या सिनेमात आला तसं त्याच्या कायद्याचं बोला हा सिनेमा मला खूप आवडला होता. मकरंदने एका मालिकेत एक सीन केला होता. तेव्हा त्याला मी भेटून सांगितलं होतं की, मस्त केला तो रोल. "
"मक्याने मला आता थांबायचं नाय सिनेमाचा टीझर बघून मला फोन केला. भारत्या मस्त वाटतंय रे, तू काहीतरी वेगळं करतोय असं वाटतंय. स्पर्धा हा प्रकार मराठीत आहे, असं मला नाही वाटत. अशोकमामा होता, लक्ष्यामामा होता तेव्हाही नव्हतं. त्याच्याआधीही नव्हतं. हा प्रकार स्पर्शही करत नाही. तू म्हणतोस तसं स्वाभाविक प्रश्न आहे. पण या गोष्टींंचा स्पर्श तेव्हाही झाला नाही. आताही होणार नाही. सध्या साडे माडे तीनचं शूटिंग करताना आम्ही धमाल केलीय. " अशाप्रकारे भरत जाधव यांनी खुलासा केला. भरत जाधव यांचा १ मे रोजी नवीन मराठी सिनेमा भेटीला येणार आहे.