'हीच ती वेळ आपले कर्तव्य बजावण्याची', कोरोनाग्रस्तांसाठी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट देण्याचे भरत जाधवने केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 02:02 PM2021-04-24T14:02:05+5:302021-04-24T14:02:37+5:30
भरत जाधवने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमधून लोकांना कोरोना रुग्णांसाठी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, गाळे देण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसचे संकट देशात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा परिस्थिती रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. अशात अभिनेता भरत जाधवने एका सोसायटीत कोरोना रुग्णांसाठी राबवलेल्या उपक्रमाची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली आहे. इतकेच नाही तर त्याने आपल्या पोस्टमधून लोकांना कोरोना रुग्णांसाठी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, गाळे देण्याचे आवाहन केले आहे.
भरत जाधवने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत म्हटले की, सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे...माझ्या सोसायटी मध्ये ४ जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट वन बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील २ रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा - औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा ६ महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले.
पुढे त्याने सांगितले की, १५ दिवसांनी सर्व जण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊंन आपले कर्तव्य करण्याची."
भरत जाधवच्या या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. हा खरोखर स्तुत्य उपक्रम असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.