भारतही जिंकला आणि भरतही! 'सही'च्या प्रयोगावेळी 'गलगलें'नी केली होती वर्ल्ड कप जिंकल्याची घोषणा, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:38 IST2025-01-17T09:38:17+5:302025-01-17T09:38:55+5:30
भरत जाधव यांनी 'सही रे सही' नाटकावेळी घडलेला खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला (bharat jadhav)

भारतही जिंकला आणि भरतही! 'सही'च्या प्रयोगावेळी 'गलगलें'नी केली होती वर्ल्ड कप जिंकल्याची घोषणा, अन्...
भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेलं सही रे सही नाटक गेली अनेक वर्ष रंगभूमीवर सुरु आहे. आजही या नाटकाचे शो हाउसफुल्ल होतात. भरत यांची बहुरंगी भूमिका असलेलं हे नाटक आजही प्रेक्षकांच्या जवळचं आहे. भरत या नाटकात एकूण चार भूमिका साकारतात. त्यापैकी गाजलेली भूमिका म्हणजे गलगले. एकदा सही रे सहीच्या प्रयोगाला भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान भरत जाधव यांनी असं काय केलं की प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. त्याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे.
भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत झालेल्या संवादात भरत यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "भारत - पाकिस्तानची वर्ल्डकप मॅच होती. आणि त्यादिवशी तीन शो लावले होते. अशोक मुळ्ये म्हणजेच मुळ्ये काकांनी ती जाहिरात केली होती की, आज भरत जिंकणार की भारत जिंकणार? जाहिरात ऐकूनच मी त्यांना फोन लावला होता की, असं नाव नका देऊ. आपण नाटकाचं नाव जरा जपण्याचा प्रयत्न करु. उद्या कोणी तोंडात नको मारायला. पण तिन्ही शो हाउसफुल्ल झाले होते."
"तिन्ही शोपैकी मधला शो फक्त महिलांसाठी होता. आतमध्ये मेकअप रुममध्ये बारीक आवाजात कॉमेंट्री चालू होती. बरोबर गलगलेच्या सीनला कळालं की, इंडिया जिंकली. काय ऐकताय गलगले इंडिया जिंकली वाह, असं मी म्हणताच सात ते आठ मिनिटं लोक उभ्या राहून टाळ्या वाजवत होते. मला वाटतं दुसऱ्या दिवशी एका वृत्तपत्रात ती लाइन होती की, गलगलेमुळे आम्हाला कळलं की भारताने मॅच जिंकलीय. अशाप्रकारे मी स्टेजवर addition घेतलं होतं." अशाप्रकारे भरत जाधव यांनी खास किस्सा सांगितला.