"नाटकाला येणारे प्रेक्षक वडिलांवर चिडले तेव्हापासून मी.." भरत जाधव यांनी सांगितला भावूक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:45 PM2023-05-03T15:45:26+5:302023-05-03T15:47:14+5:30
एका मुलाखतीत वडिलांबद्दलचा किस्सा सांगताना भरत जाधव भावूक झाले होते.
'ऑल द बेस्ट' असो किंवा 'सही रे सही' अशा अनेक नाटकांनी रंगभूमी गाजवणारे अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav). त्यांच्या अभिनयाचे कोण चाहते नाहीत असं कोणीच नसेल. रसिक प्रेक्षक तर त्यांचे चाहते आहेतच. पण भरत जाधव यांच्या यशामागे त्यांच्या वडिलांचेही तेवढेच कष्ट आहेत. त्यांच्या वडिलांनी टॅक्सी चालवून कुटुंबाचा सांभाळ केला आहे. एका मुलाखतीत वडिलांबद्दलचा किस्सा सांगताना भरत जाधव भावूक झाले होते.
एका कार्यक्रमात भरत जाधव म्हणाले होते की," एक दिवस दादरला शिवाजी मंदिरला माझ्या नाटकाचा प्रयोग होता. माझ्या वडिलांच्या टॅक्सीमध्ये बसलेले प्रवासी माझं नाटक बघायला येत होते. पण आधी वडिलांना हे माहित नव्हतं की ते माझं नाटक बघण्यासाठी शिवाजी मंदिरला जात आहेत. जेव्हा ट्रॅफिकमध्ये वेळ जायला लागला तेव्हा त्या प्रवाशांनी माझ्याच वडिलांवर चिडचिड केली. नाटकाची वेळ चुकू नये म्हणून ते माझ्या वडिलांशी चिडून बोलत होते. तेव्हा त्यांना समजलं की माझ्याच नाटकाचा प्रयोग आहे. प्रवाशांची होणारी चिडचिड बघून उलट त्यांचा उर अभिमानाने भरुन आला होता."
ते पुढे म्हणाले," प्रयोग संपल्यावर जेव्हा मी रात्री घरी गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की शिवाजी मंदिरला तुझाच प्रयोग होता का आज. तर यावर मी म्हणालो हो. तेव्हा त्यांनी मला घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांच्या बोलण्यात कुठेच त्या प्रवाशांवरचा राग दिसला नाही उलट माझंच कौतुक होतं. पण मला ते ऐकून उदास वाटलं आणि त्या दिवशी मी त्यांना म्हणालो की बास आता, यापुढे टॅक्सी चालवायची नाही."
ते म्हणाले,"इतकंच नाही तर माझं म्हणणं वडिलांनी मान्य केलं तरी टॅक्सी तशीच ठेवून दिली. कारण त्यांना कल्पना होती की हे हे क्षेत्र किती बेभरवशाचं आहे. म्हणून त्यांनी टॅक्सी विकली नाही. सहा महिन्यांनी जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तेव्हा त्यांनी टॅक्सी विकली."