'मरा सिगारेट पिऊन ’; सिगारेटसोबत फोटो काढणं मराठी अभिनेत्रीला पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 02:03 PM2023-08-15T14:03:16+5:302023-08-15T14:04:13+5:30
Marathi actress: तिने नुकतंच तिचं ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’ हा कार्यक्रम सुरू केला. याच शोमध्ये भार्गवीने तिचा हा अनुभव सांगितला.
सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे व्यक्ती एकमेकांपासून कितीही दूर असले तरीदेखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज संवाद साधू शकतात. याचाच फायदा कलाकार आणि चाहत्यांना होतो. अनेक कलाकार इन्स्टाग्राम, फेसबूक यांच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतात. त्यांच्या जीवनातील लहानमोठे किस्से शेअर करत असतात. मात्र, यात बऱ्याचदा कलाकारांना प्रेमासोबतच ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असाच एक अनुभव अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिला आला. एका मुलाखतीत तिने भाष्य केलं.
भार्गवी चिरमुले हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. मराठी कलाविश्वात तिने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. अलिकडेच तिने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने लोकांनी तिला कशाप्रकारे ट्रोल केलं हे सांगितलं.
भार्गवीने नुकतंच तिचं ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’ हा कार्यक्रम सुरू केला. शो पॉडकास्टमध्ये कलाकार मंडळींची छान मुलाखत घेतली जाते. त्यांचे अनुभव शेअर केले जातात. अलिकडेच या शोमध्ये अभिनेत्री पूजा सावंतने हजेरी लावली होती. यावेळी तिच्याशी गप्पा मारताना भार्गवीने तिला आलेला ट्रोलिंगचा किस्सा सांगितला.
“आम्ही लहान असताना शाळेत फॅन्टमची गोड सिगारेट मिळायची. ती गोळी सिगारेटसारखी दिसायची आणि त्याच्या पुढच्या भागाला लाल रंग असायचा. आई आम्हाला कधीच लिपस्टिक लावू देत नव्हती. त्यामुळे मी आणि चैत्राली दोघी पण त्या फॅन्टमच्या पुढे असलेल्या लाल रंगाने ओठ रंगवायचो. तर, खूप वर्षांनंतर आम्हाला ती फॅन्टमची सिगारेट अँमेझॉन कि पानटपरीवर कुठे तरी मिळाली होती. जे तोंडात धरुन आम्ही फोटो काढला होता.आणि, तो फोटो सोशल मीडियावर टाकला.त्या फोटोच्या खाली ‘फॅन्टम गोड सिगारेट, जुन्या आठवणी,’ असं कॅप्शन सुद्धा आम्ही दिलं होतं. तरी लोकांनी ट्रोल केलं, असं भार्गवी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्या फोटोवर लोकांनी सडकून टीका केली होती. या कमेंट पाहून शेवटी असं झालेली की हा फोटो डिलीट करावा. लोकांनी अगदी,‘मरा सिगारेट पिऊन,’ वगैरे असं लिहिलं होतं. "