कॉपीराईटच्या वादात अडकले 'भरजरी पितांबर'; 'श्यामची आई' चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस
By संजय घावरे | Published: November 7, 2023 09:21 PM2023-11-07T21:21:20+5:302023-11-07T21:21:39+5:30
नवीन चित्रपटातील गाणे इंटरनेट आणि युट्यूबवर रिलीज करण्यात आले असून, नवीन 'श्यामची आई' शुक्रवारी रिलीज होणार आहे.
मुंबई - साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारलेला दिग्दर्शक सुजय डहाकेचा 'श्यामची आई' हा सिनेमा कॉपीराईटच्या वादात अडकला आहे. जुन्या 'श्यामची आई' चित्रपटाचे लेखक आचार्य अत्रे यांच्या वंशजांनी 'भरजरी गं पितांबर दिला फाडून...' या गाण्यावर आक्षेप घेतल्याने या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या निर्मात्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
नवीन 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अमृता फिल्म्स प्रा. लि., पुणे फिल्म कं. प्रा. लि., पॅनरोमा स्टुडिओज-पॅनोरमा म्युझिक यांना कॉपीराईट हक्काचे उल्लंघन केल्याबद्दल नोटिस पाठवण्यात आली आहे. प्र. के. अत्रे यांची नातवंडे राजेंद्र पै, विद्याधर पै, हर्षवर्धन देशपांडे, प्रिया घमंडे यांच्या वतीने अॅडव्होकेट बिना पै यांनी 'श्यामची आई'च्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. १९५३मध्ये रिलीज झालेल्या अत्रेंची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, गीतलेखन केलेल्या 'श्यामची आई' या मूळ चित्रपटातील 'भरजरी गं पितांबर दिला फाडून...' हे गाजलेले गाणे घेऊन स्वामीत्व हक्काचे उल्लंघन करण्यात आल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
नवीन चित्रपटातील गाणे इंटरनेट आणि युट्यूबवर रिलीज करण्यात आले असून, नवीन 'श्यामची आई' शुक्रवारी रिलीज होणार आहे. याबाबत 'लोकमत'शी बोलताना 'श्यामची आई'चा दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाला की, आमचा सिनेमा कादंबरीवर आधारित आहे. नोटीसबाबत मला काही माहित नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही. वकिलांचा सल्ला घेऊन पुढील पाऊल उचलण्यात येईल. हि केवळ नोटिस असल्याने 'श्यामची आई'च्या प्रदर्शनात काहीच अडथळा येईल असे वाटत नसल्याचेही सुजय म्हणाला.