कपिल शर्माच्या सेटवरून 'या' मुलाला दोनदा हाकलून दिलं होतं, आज तोच बनला TDMचा हिरो...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 04:26 PM2023-04-09T16:26:26+5:302023-04-09T16:26:55+5:30
Bhaurao karhade TDM MarathI Movie : 'प्रेक्षक, ऑफिस बॉय ते थेट नायक' असा आहे 'टीडीएम'चा नायक पृथ्वीराजचा प्रवास
Bhaurao karhade TDM MarathI Movie : नशीब बदलायला वेळ लागत नाही. मायानगरी मुंबईत तर अशा एक ना अनेक कहाण्या मिळतील. मायानगरीत हिरो० हिरोईन होण्याचं स्वप्न घेऊन इथे रोज कित्येकजण येतात. काहीजण यशस्वी होतात तर काहीजण निराश होऊन माघारी वळतात. या कथा प्रेरणादायी असतात. 'टीडीएम' या आगामी सिनेमाचा हिरो पृथ्वीराज याची कथाही अशीच प्रेरणादायी आहे. 'प्रेक्षक, ऑफिस बॉय ते थेट नायक हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. नामवंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम' या सिनेमात पृथ्वीराज (Pruthviraj) मुख्य नायक म्हणून झळतोय.
सिनेसृष्टीतल्या कामाची आवड होती म्हणून पृथ्वीराजने पुण्यावरून थेट मुंबई गाठली. मुबईतल्या फिल्मसिटीमध्ये सेटवर होणाऱ्या हालचालींना पाहण्याची उत्सुकता, तिथे होणाऱ्या तांत्रिक घडामोडी, तिथला माहोल आणि अभिनयाची आवड हे सारं काही त्याला शांत बसू देत नव्हतं. या प्रवासाची पृथ्वीराजने सांगितलेला किस्सा ऐकून विश्वास बसणार नाही.
तो म्हणाला, दोन चारदा मी कपिल शर्मा शोमध्ये प्रेक्षक म्हणून जाण्याचा प्रयत्न केला. सेटवर पाेहोचलो पण माझ्या ओळखीतलं कुणीच नसल्यानं मला तिथून हाकलून देण्यात आलं. एक दिवशी पुन्हा मी सेटवर पोहोचलाे आणि सेटवर काम करणाऱ्या एका काकांना भेटलो. मी खूप लांबून हा शो बघण्यासाठी आलोय असं त्यांना सांगितल्यावर, त्यांनाही माझी दया आली असावी. ते मला शोच्या व्यवस्थापकाजवळ घेऊन गेले. त्याच्या हातापाया पडून मी तो शो लाईव्ह पाहिलाच.
'प्रेक्षक, ऑफिस बॉय ते थेट नायक...
पृथ्वीराज हा सिनेमाच्या नायकाची स्टोरी एकदम भन्नाट आहे. तो आधी गावाकडे शेती करायचा. पण सिनेमाची आवड होती. मुंबईत फिल्म सिटीत काही काम मिळतं का, दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा सिनेमाचं शूटींग सुरू असताना पृथ्वीराज असाच सहज म्हणून सेटवर गेला होता. भाऊराव व त्याची काहीही ओळख नव्हती. बबन या चित्रपटाच्या वेळी त्याने भाऊराव यांना गाठलं. मला प्रॉडक्शनला तरी काम द्या, असं तो म्हणाला.
भाऊराव यांनी त्याला प्रॉडक्शनला काम दिलं. बबनच्या हिरोचा बॉय म्हणून पृथ्वीराजने काम केलं. बबनचं शूट संपल्यानंतर सगळे पुण्याला पांगले. पृथ्वीराज मात्र गावाला परतला. पण तिथे त्याला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा भाऊराव यांच्याकडे गेला आणि मला काम द्या, मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणत त्याने पुन्हा विनंती केली. भाऊराव यांनी त्याला ऑफिस बाॅय म्हणून काम दिलं. पृथ्वीराज त्यांच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करू लागला. हा ऑफिस बॉय भाऊरावांच्या सिनेमाचा हिरो बनेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खुद्द पृथ्वीराजनेही तशी अपेक्षा केली नव्हती. पण पृथ्वीराजमध्ये असे काही गुण होते की, हाच आपला हिरो यावर भाऊराव ठाम होते. तू तयारी कर, असं त्यांनी पृथ्वीराजला सांगितलं. आपल्याला छोटीमोठी भूमिका मिळेल, अशी पृथ्वराजची अपेक्षा होती. पण तूच लीड भूमिका करताय, असं त्याला सांगितलं गेलं, तेव्हा क्षणभर त्याचाही विश्वास बसेना. सर आपली फिरकी घेत आहेत, असंच त्याला वाटलं. पण भाऊराव यांना पृथ्वीराजमध्ये वेगळं काही दिसलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला हिरो म्हणून निवडलं आणि त्यांची निवड योग्य ठरली...
आज 'टीडीएम' चित्रपटामुळे पृथ्वीराज 'चारो तरफ छा गया है' असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये एक हुकमी डायलॉग होता, वक्त बदलने मे देर नहीं लगती….’अगदी तसंच पृथ्वीराजच्या बाबतीत घडलं. 'ख्वाडा', 'बबन' चित्रपटानंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' चित्रपटातून पृथ्वीराज चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. 'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपट येत्या २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.