"फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही", TDM दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:01 PM2023-05-04T14:01:43+5:302023-05-04T14:03:34+5:30
आईचे हुंदके अजूनही कानात घुमत आहेत अभिनेता पृथ्वीराज थोरातही यावेळी भावूक झाला
'ख्वाडा', 'बबन' या सारख्या अस्सल गावरान ढंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी छाप उमटवणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhau Karhade) यांचा 'TDM' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रीन न मिळाल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले. लोकांना सिनेमा पाहायचा आहे पण शोजच मिळत नसतील तर कसं चालणार. कोटींचं कर्ज काढून सिनेमा बनवला आहे त्याचं असं चीज होणार असेल तर फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत भाऊराव कऱ्हाडे यांनी खंत व्यक्त केली.
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, "आज सिनेमा बंद पडला तर आम्हाला फाशी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.साडेतीन कोटींचं कर्ज काढून सिनेमा केलाय कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज आहे, पै पै उभी केली आहे आम्ही. हा कलाकारांचा मर्डर आहे. माफक अपेक्षा आहे जे आमच्या वाट्याचं आहे ते आम्हाला द्या."
ते पुढे म्हणाले, "पुण्यात बाकीच्या सिनेमांना १५० शो आणि माझ्या सिनेमाला केवळ २१ शो. बाकी सिनेमांची माहिती काढून बघा त्यांच्या सिनेमाला अशी किती गर्दी आहे. माझ्या सिनेमाला किमान प्रेक्षक तरी आहेत." हे सांगताना भाऊराव यांना अश्रू अनावर झाले.
मुख्य कलाकार पृथ्वीराज थोरात यावेळी भावूक झाला. म्हणाला, "मी शेतकरी कुटुंबातला आहे. डोंगरात माझं गाव आहे. आईने कर्ज काढून, खूप काबाडकष्ट करुन मला इथे पाठवलं. आज तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिचे हुंदके मला ऐकू आले ते माझ्या कानात घुमत आहेत."